मी किरण ठाकूर मूळ जळगाव जिल्ह्यातला. ते किरण ठाकुर बेळगावचे.
दोघांचेही मूळ पत्रकारितेतले. दोघांचीही श्रद्धा लोकमान्य टिळक यांच्या पायाशी. दोघांचेही आदर्श पत्रकारितेतील, दैनिक सकाळचे डॉक्टर नानासाहेब परुळेकर. काल परवा पर्यंत फक्त माझ्याच नावा आधी “डॉक्टर” लिहिले जायचे. ते “श्री” किरण ठाकुर होते. आता त्यांच्या देखील नावापूर्वी डॉक्टर ही उपाधी सन्मानाने लावली जाणार आहे.
पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सहा एप्रिल २०२४ रोजी त्यांच्या कर्तबगारीचा सन्मान एका भावपूर्ण पदवीदान समारंभात डी लिट ही सन्माननीय पदवी देऊन केला, आता आम्ही दोघेही डॉ किरण ठाकूर आहोत. पण हे साम्य आणि ही गमतीची तुलना येथेच संपते. वर्तमानपत्रात आमच्या दोघांच्या नावाचा उल्लेख झाला तर वाचकांचा गोंधळ यापुढे होतच राहणार आहे. आमच्या नावाची ही गोष्ट लिहिण्याची बहुदा हीच योग्य वेळ आहे. त्यातील माझी गोष्ट थोडक्यात आटोपता येईल अशीआहे. त्यामुळे ती आधी सांगतो.
माझे नाव शाळा कॉलेज च्या रेकॉर्ड मध्ये “किरणचंद्र कन्हैयालाल ठाकूर.” जन्म १३ मार्च १९४७ रोजी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथला. वडील महसूल खात्यात नोकरी करणारे, मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांवर प्रभुत्व असणारे. पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण घेऊन मी पत्रकार झालो. माझी पत्रकारिता नानासाहेब परुळेकर यांच्या मराठी दैनिक सकाळ मध्ये १९६९-७० मध्ये सुरु झाली. नंतर ती युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तसंस्थेत झाली. अगदी तटस्थपणे दोन्ही बाजू सांगणारे वार्तांकन करणे, आपली स्वतःची मते लिखाणात चुकून सुद्धा येणार नाहीत याची दक्षता मी आयुष्यभर घेतली. पुढे वृत्तपत्रविद्या विभागाचा शिक्षक झालो तेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना देखील हेच धडे मी दिले. इंग्रजी वर्तमान पत्रांसाठी थोडक्यात आणि सोपे कसे लिहावे हे शिकवले. ऑनलाइन जर्नलिजम मधली भारतातील पहिली पीएचडी मला मिळाली. अर्धा डझन पुस्तके पत्रकारितेवर लिहिली. संत ज्ञानेश्वर आणि वारकरी संप्रदाय हे माझ्या अभ्यासाचे विषय हल्ली झाले आहेत. सेंद्रिय शेती हा माझ्या औत्सुक्याचा विषय आहे. त्यासंबंधी जमेल तेव्हा मराठी आणि इंग्रजी मध्ये लिहिण्याचा प्रयत्न मी करतो. येथे माझी कहाणी संपते.
दुसऱ्या “किरण ठाकुर” यांची कहाणी मात्र विस्तृत असणे आवश्यक आहे. बेळगावच्या “किरण बाबुराव ठाकुर” यांचा जन्म ७.४. १९५२ चा. स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आदींच्या चळवळीतील पार्श्वभूमी असलेल्या बाबुराव ठाकूर यांचे ते सुपुत्र.
बाबुराव यांनी साप्ताहिक, मासिक आणि दैनिक तरुण भारत अशी पत्रकारिता केली. स्वातंत्र्य आंदोलन आणि सीमा भागातील प्रश्न हेच त्यांच्या पत्रकारितेचे मुख्य विषय होते. तरुण भारत या नावाचे मराठी भाषेत नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी दुसरे दैनिक आहे. “तरुण भारत, बेळगाव” चा वेगळा दबदबा निर्माण झाला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या भागात सामाजिक, राजकीय विषयावर बातम्या आणि दिशा देणारे लढाऊ दैनिक अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली. या दैनिकाचे सल्लागार संपादक श्री किरण ठाकुर हे त्यांच्या कार्यक्षेत्राचा एक भाग.
सन्मानीय डी लिट पदवी धारक डॉ. किरण ठाकुर
त्यांच्या विस्तारीत कार्याविषयी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ दीपक टिळक आणि कुलगुरू टिळक यांच्या नेतृत्ताखालील विद्वान मंडळींनी परीक्षण करून सन्मानीय डी लिट पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्या मानपत्राच्या संपादित मजकुरावरून डॉ. किरण ठाकुर यांच्या विस्तृत कर्तबगारीविषयी थोडक्यात कल्पना येऊ शकते:
सहकार, पत्रकारिता, शिक्षण या समाज घडणीतील महत्त्वाच्या क्षेत्रांवर डॉ किरण ठाकुर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. स्वातंत्र्य चळवळीस अनेक चळवळीमध्ये अग्रभागी राहिलेल्या आणि सामाजिक प्रगतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या आपल्या आई-वडिलांचा - बाबूराव ठाकूर आणि माई ठाकूर यांचा उज्ज्वल वारसा ते समर्थपणे पुढे नेत आहेत.
महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि सहकार क्षेत्रातील खंद्या नेत्यांपासून प्रेरणा घेत १९९५ मध्ये त्यांनी बेळगाव या आपल्या कर्मभूमीत लोकमान्य सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. लघु आणि नव उद्योजकांना आर्थिक पाठबळ देऊन लोकमान्य सहकारी पतसंस्था बेळगाव आणि परिसरातील अर्थकारणाला वेगवान गती मिळवून दिली. आपल्या कुशल नेतृत्वाखाली या पतसंस्थेने गुणवत्तापूर्ण प्रगतीची आणि विस्ताराची नवी क्षितिजे पादाक्रांत करीत देशातील प्रथम क्रमांकाची आंतरराज्यीय सहकारी पतसंस्था, हे स्थान मिळविले.
सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून त्यांनी सुरू केलेले 'लोककल्प फाउंडेशन' असंख्य कुटुंबांना त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यात मदत करीत आहे. कर्नाटक-गोवा सीमेवर अनेक गावे दत्तक घेऊन 'लोककल्प फाउंडेशन'ने समृद्धीची दिशा दिली. संधीपासून जे वंचित आहेत, मात्र स्वप्नपूर्तीसाठी कष्टाची तयारी आहे अशा सर्वांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. आरोग्यशिबिर, क्रीडास्पर्धा यांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, सर्वसामान्यांच्या प्रगतीला पाठबळ देत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते अथक प्रयत्न करीत असतात.
बाबूराव ठाकूर यांनी स्थापन केलेल्या तरुण भारत, बेळगाव या वृत्तपत्राला त्यांनी सर्वदूर पोहोचवून वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून दिले आहे. अवध्या २७ व्या वर्षी डॉ किरण ठाकुर यांच्या खांद्यावर 'तरुण भारत, बेळगाव ' च्या संपादकपदाची धुरा आली. आज कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांतून 'तरुण भारत' प्रकाशित होत असून, आपल्या आठ आवृत्तींद्वारे या वृत्तपत्राने पत्रकारिता क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. अन्यायाविरुद्ध सतत आवाज उठवत तसेच सत्य आणि पारदर्शकतेचा आग्रह धरीत आपल्या वृत्तपत्राने शताब्दीचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला. इंडियन न्यूजपेपर सोसायटी, ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन या केंद्रीय पातळीवरील सर्वोच संस्थांचे ते सन्माननीय सदस्य म्हणून ते काम करीत आहेत.
बेळगावमधील दक्षिण कोकण शिक्षण संस्था, बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती, बेळगावमधील ज्ञान प्रबोधन मंदिर शाळा यांसह विविध शिक्षण संस्थांशी ते निगडित आहेत. या संस्थांद्वारे नव्या पिढीची जडणघडण आणि शिक्षण प्रसाराचे मोलाचे कार्य होत आहे.
रावसाहेब गोगटे पुरस्कार, बिझनेस गोवा अवॉर्ड, जागतिक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स उद्योजकता पुरस्कार, शं. न्या. किर्लोस्कर ट्रस्ट पुरस्कार, पत्रकारितेतील कार्यासाठी डॉ. ना. भि. परुळेकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, महर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार, कोकण भूषण पुरस्कार, बेळगावच्या सरस्वती वाचनालयाचा बेळगाव भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहा एप्रिल २०२४ रोजीच्या चाळिसाव्या पदवीदान समारंभात डॉ किरण ठाकुर यांच्या समवेत आणखी दोन दिग्गजांना सन्मानीय डी लिट पदवीने गौरविण्यात आले. डॉ नौशाद फोर्ब्स आणि भारत विकास ग्रुप चे श्री हणमंतराव गायकवाड अशा त्या अन्य उत्सवमूर्ती होत. कुलपती डॉ दीपक टिळक,कुलगुरू डॉ गीताlली टिळक यांनी या सन्मान डी लिट पदव्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या चाळिसाव्या पदवीदान समारंभात प्रदान केल्या.
***
या नामसाधर्म्य असणाऱ्या किरण ठाकूर आणि किरण ठाकुर यांनी आयुष्यात अनेक वेळा गमतीशीर अनुभाव देखील घेतले. त्यावर मी एकदा थोडे लिहिले होते. त्याचा छोटासा भाग या निमित्त्याने पुनः एकदा लिहावासा वाटतो::
किरणचंद्र कन्हैयालाल ठाकूर हे माझे शाळेतले नाव. पत्रकारितेच्या अभ्यासासाठी पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूट बिल्डिंग मध्ये १९६९-७० मध्ये प्रवेश केला तेव्हा लेखनासाठी लेखक म्हणून वेगळे नाव नव्हते. मी विजय तेंडुलकर यांचा फॅन होतो. त्यांची नाटके आणि वृत्तपत्रीय लेख खूप आवडायचे. विशेषतः साप्ताहिक माणूस मधील लेख तेव्हा खूप गाजायचे. फॅन म्हणून त्यांना काही पत्र देखील मी लिहिली होती. त्यांचे सुंदर हिरव्या शाईत लिहिलेली एक- दोन पत्रे मला आली होती. ती अजूनही मी जपून ठेवली आहेत.
तेव्हा ते लोकसत्ता मध्ये सहायक संपादक होते. रविवारच्या पुरवणीसाठी मी एक लेख लिहिला आणि धाडस करून त्यांच्याकडे पाठवला. त्यावेळी सुद्धा माझे हेच पूर्ण नाव दिले होते. आठ-पंधरा दिवसात तो छापून आला. तेंडुलकरांनी त्याचे संपादन केले असे मला उगीचच वाटलं. त्यांनी लेखकाचे म्हणजे माझे नाव बदलून छोटे सहा अक्षरी “किरण ठाकूर” असे छापले. त्या लेखाच्या शीर्षकात तेरा शब्दांचा मोठा मधळा बसला नाही, म्हणून सहा अक्षरात बसवला. माझ्या नामांतरा चे श्रेय अशा त-हेने विजय तेंडुलकर यांना जाते.
पण या बदलामुळे पुढे आयुष्यात खूप गमती जमती तेव्हा घडल्या. अजूनही माझ्या वयाच्या अठ्ठ्यातराव्या वर्षी घडत आहेत.त्याची ही गोष्ट;
शेक्सपियर ने नावात काय आहे असे म्हणून ठेवले असले तरी नावात खूप गमती जमती करण्याची क्षमता आहे. ती कशी त्याची पार्श्वभूमी आधी.
विजय तेंडुलकरांमुळे लोकसत्तेत मी किरण ठाकूर नावाने लेख लिहिला. त्यानंतर माणूस, वाङ्मयशोभा, मनोहर, अमृत, सकाळ अशा ठिकाणी हेच नाव कायम राहिले. वडिलांना खूप कौतुक वाटायचे. त्यावेळी ते नाशिकला राहत असत. शहरभर आपल्या सर्व मित्रांना तो अंक दाखवायला ते घेऊन जायचे. लेखावर ‘त्याचे नाव ‘किरण ठाकूर’ असले, पण तरी तो माझाच मुलगा “किरणचंद्र कन्हैयालाल ठाकूर” आहे बर का असे मित्रांना गमतीने सांगायचे. तेव्हा किरण ठाकूर नावाची दुसरी कुठली व्यक्ती असेल असे माझ्या ध्यानीमनी देखील नव्हते.
पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पहिली इंग्रजी वृत्तसंस्थे मधली नोकरी करण्यासाठी दिल्लीला गेलो. काही महिन्यातच राजधानीतील मराठी पत्रकारांच्या ओळखी झाल्या. महाराष्ट्रातील महत्त्वाची मंडळी दिल्लीत आली की पत्रकारांना निरोप जायचे. मग सगळ्यांनी एकत्रित भेटायचं अशी प्रथा होती. काही वेळा बातमीचा विषय असेल तर त्यासाठी भेटीगाठी घ्यायच्या असा उपक्रम सुरू असायचा.
एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते बाबुराव ठाकुर आपल्या काही कामासाठी आले होते हे कळल्यावर त्यांना भेटायला त्यांच्या हॉटेलवर मी गेलो. इंटरकॉम फोनवर निरोप दिला किरण ठाकुर म्हणून नाव सांगितलं. ते अत्यंत त्वरेने बाहेर आले. कुठे आहे किरण म्हणून शोधू लागले. मी तर समोरच होतोच . मग मी स्वतःची ओळख दिली. तेव्हा त्यांचा हिरमोड झाला. त्यांना अपेक्षा होती त्यांचा सुपुत्र किरण बेळगावहुन अचानक दिल्लीत आला आहे. घरी न सांगता हा कसा आला याची ती काळजी होती. हा तर दुसराच कोणी किरण ठाकूर त्याची त्यांना सुद्दा गंमत वाटली. आमच्या गप्पा झाल्या. चहापान झाले, निरोप घेतला.
येथून नाम साधर्म्याच्या च्या गमतीजमती सुरु झाल्या. बेळगावच्या किरणच्या आडनावात “कु” हृस्व तर माझा दीर्घ “कू ” एव्हडाच काय तो फरक.
बाबुरावजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते होते तसे बेळगाव च्या तरुण भारत या वृत्तपत्राचे मालक संपादक होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर त्यावेळी सतत आंदोलने होत असत. त्यात आधी ते आणि नंतर किरण नेतृत्व करायचे. मुंबई विधानसभेत येऊन आंदोलन केल्यामुळे किरण ला अटक व्हायची. त्याच्या बातम्या मुंबईच्या दैनिकात ठळकपणे यायच्या. हेडलाईन मध्ये देखील “किरण ठाकुर यांना अटक” असं प्रसिद्ध व्हायचं माझ्या नातेवाईकांना चिंता वाटायची. भेट झाली तेव्हा मला खडसावून विचारायचे . तुला काय गरज आहे या गोष्टी साठी आंदोलन करायची? “विषय बेळगावचा, आपण जळगावचे. काही अर्थाअर्थी आपला संबंध नसताना तू कशाला या आंदोलनात अटक करून घेतो” अशी त्यांची विचारणा असायची.
माझं लग्न झाल्यावर पुण्याच्या लक्ष्मीनगर मध्ये चाळीतील एका घरात राहू लागलो. “ज्येष्ठ पत्रकार बाबुराव ठाकुर यांचे निधन झाले” ही बातमी पुण्याच्या अनेक दैनिकात प्रसिद्ध झाली. ती वाचून आमचे शेजारी समाचाराला आले. शोकाकुल वातावरण दिसेना. शेवटी एकीने धाडस करून विचारलं की सासरे देवाघरी गेले तरी तुझ्या डोळ्याला आसवाचा एकही थेंब नाही, असे कसे?
काही वर्षांनी बेळगावच्या किरण ठाकुर चे लग्न ठरल्याची पत्रिका पुण्यात काही ठिकाणी आली. ती पाहून माझ्या दोन तीन मित्रांनी माझ्या पत्नीला छेडले च. तुझा नवरा दुसरे लग्न करायला निघाला आहे आणि तू अशी डोळ्यावर पट्टी बांधल्या सारखी स्वस्थ कशी बसली आहेस! त्यांनी सोबत त्या पत्रिकेचा एक नमुना आणला होता. पण तोपर्यंत या गमतीजमती दोन-चार वेळा होऊन गेल्या होत्या त्यामुळे तिला फार काळजी वाटण्याचे कारण नव्हते.
मराठी लोकांचे मुखपत्र म्हणून तरुण भारत खूप प्रभावीपणे काम करत असतो. पण त्याचा प्रभाव कर्नाटकामधील बेळगाव परिसरात मर्यादित होता, ते देखील मराठी भाषकांसाठी. महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका कर्नाटक राज्यात प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण इंग्रजी देखील दैनिक काढावे, असे मालक संपादक किरण ठाकुर यांच्या मनात आले. एकदा ते पुण्यात आले तेव्हा त्यांनी मला ऑफर दिली: या इंग्रजी वर्तमानपत्राचा संपादक म्हणून मी काम करावे.तशी ऑफर आकर्षक होती. पण पुणे सोडून बेळगावी येणे शक्य नव्हते. त्यामुळे मी नाही म्हटले. मग त्यांनी मिश्किलपणे हे देखील सांगून टाकले की मला इंग्रजी चा संपादक नेमण्यामागे त्यांचा एक वेगळा हेतू होता. आपल्या एकीकरण समितीच्या कामामुळे अटक करायला बेळगावचे पोलीस आले आणि किरण ठाकूर कोणते हे विचारलं तर स्टाफ च्या लोकांनी माझ्याकडे बोट दाखवायचे आणि मला उचलून तुरुंगात टाकले तरी बेळगाव चे किरण ठाकुर आपले संपादकीय काम चालूच ठेवू शकतील!
त्या किरण ठाकुर यांनी नी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक , क्षेत्रात भरीव काम केले आहेच. आता लोकमान्य मल्टि पर्पज सोसायटी चे १९९५ पासून काम सुरू केले. फार मोठा पसारा होतो आहे आणि सारखा विस्तार होत आहे. बातम्या, जाहिराती, आणि सामाजिक कार्यातील सहभाग यामुळे त्याच्या नावाची प्रसिद्दी नेहमी होते. तेव्हा नाम साधर्म्य चे याचे आणखी वेगळे अनुभव यायला लागले. माझा फोन नंबर शोधून माझ्याशी या पतपेढी संबंधीची कामे सांगायला काही लोक बोलायला लागले आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संबंधीच्या तक्रारी मला ऐकवू लागले. कर्जासंबंधीची गळ घालण्यासाठी रात्री उशिरापर्यंत केव्हाही फोन येऊ लागले. आता हे प्रकार खूप कमी झाले आले आहेत . केव्हातरी एखाद दोन प्रसंग येतात. पण अगदी अलीकडे आणखी वेगळाच अनुभव आला. मी लोकमान्य चा किरण ठाकुर असे गृहीत धरून पुण्यातील एका महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी साठी मी अध्यक्षस्थानी यावे (आणि उपक्रमासाठी साठी देणगी द्यावी) असा प्रस्ताव देणारा तो फोन होता!!
---
No comments:
Post a Comment