Wednesday 22 July 2020

एका त्रिशतकी ट्याहांची कहाणी आणि मोल्सवर्थचे १५० वे पुण्यस्मरण

मराठी मातीशी एकरूप होऊन मराठी भाषेची सेवा करणारे जेम्स थॉमस मोल्सवर्थ हे १३ जुलै १८७१ रोजी इंग्लंड मधल्या क्लिफ्टन येथे निवर्तले, त्याला आता १५० वर्ष होतायत. जेम्स मोल्सवर्थ यांना महाराष्ट्रात मोलेसर शास्त्री किंवा मोरेश्वरशास्त्री या नावानेही ओळखले जाते. पहिला मराठी इंग्रजी सर्वसमावेशक शब्दकोश तयार करण्याचे श्रेय निर्विवादपणे मोलेसर शास्त्रींकडे जाते. यंदाचे वर्ष हे मोलेसर शास्त्रीचें सार्ध स्मरण शताब्दी वर्ष.  त्यांना जाऊन १४९ वर्षे झाली असली, तरीही हे मोलेसर शास्त्री आपल्याला अनेक ठिकाणी आजही भेटतात, ते त्यांच्या शब्दकोशाच्या रूपाने. मोलेसर शास्त्रींची अशीच एक भेट गेल्याच महिन्यात अचानक झाली त्याचीच ही कहाणी. 

कहाणी १ :-
तान्हुल्यांच्या  ट्याहां च्या मंगलस्वरांचे  त्रिशतक
मुंबई सेंट्रल परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे बा. य. ल. नायर रुग्णालय आहे. याच नायर रुग्णालयात १३ जून २०२० च्या रात्री 'कोविड १९' बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने ३०० चा टप्पा  ओलांडून ‘कोविड’ विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवार्तेची जोड दिली. एप्रिल महिन्यात 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित झालेल्या नायर रुग्णालयात दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. तेव्हापासून दोन महिन्यांच्या कालावधीत नायर रुग्णालयात ३०२ कोविड बाधीत मातांची सुखरुप प्रसूती झाली. यामध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश होता. 
..
तान्हुल्यांच्या ट्याहां च्या मंगलस्वरांनी त्रिशतकी टप्पा ओलांडला आणि बाळांची संख्या दि. १४ जून २०२० सकाळ पर्यंत ३०६ झाल्याची माहिती नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉक्टर सुषमा मलिक, प्रसूतिशास्त्र विभागाचे समन्वयक (Nodal Officer for Covid Maternity) प्रा. डॉक्टर नीरज महाजन आणि भूलशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर चारुलता देशपांडे यांनी दिली. तेव्हा उपलब्ध झालेल्या माहितीनुसार एकाच रुग्णालयात ३०० कोविड बाधित मातांची प्रसूती झाल्याचे हे जगातील एकमेव उदाहरण ठरले. 
..
मुंबई सेंट्रल परिसरात असणाऱ्या नायर रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभागातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांनी 'पीपीई किट' घालून घामाच्या धारा वाहत असताना अक्षरशः २४ तास अविश्रांत मेहनत घेऊन नवजीवन फुलवण्यात अत्यंत महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली. या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी 'पीपीई किट घातल्यानंतर सलग सहा तास पाणी न पिता किंवा शरीरधर्मही न उरकता अव्याहतपणे काम केले. या तिन्ही विभागातील अनेक डॉक्टर्स, परिचारिका वॉर्डबॉय हे दोन महिन्यांपासून घरी न जाता रुग्णालयात राहूनच अथकपणे काम करीत होते आणि आजही करत आहेत. 
..
नायर रुग्णालयात कोविड बाधित मातांच्या दोन  महिन्यांच्या कालावधीत झालेल्या ३०२ प्रसूतिंपैकी १८९ प्रसूती म्हणजेच ६३% या 'नॉर्मल डिलिव्हरी' प्रकारातील होत्या. उर्वरित ११३ अर्थात ३७% या 'सिझेरियन डिलीवरी' प्रकारातील होत्या. 'सिजेरियन डिलीवरी' प्रकारातील प्रसूती सुखरूपपणे होण्यात नायर रुग्णालयातील भूलशास्त्र विभागाची (Anesthesia Dept.) अत्यंत महत्त्वाची भूमिका होती आणि आहे. प्रसूती झालेल्या ३०२ मातांपैकी २५४ मातांना 'डिस्चार्ज' देण्यात आला.
.. 
प्रसूतिशास्त्र विभाग आणि नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) या दोन्ही विभागातील स्वच्छता आणि साफसफाई अतिशय चांगल्या प्रकारे व नियमितपणे करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी या दोन्ही विभागातील वॉर्डबॉय व कामगारांनी अतिशय मोलाची भूमिका पार पाडली. अंगावर 'पीपीई किट' चढवून व घामाच्या धारा वाहत असतानाही अक्षरश: दिवस-रात्र पद्धतीने काम करत त्यांनी या दोन्ही विभागांशी संबंधित विविध वॉर्डमध्ये चांगली साफसफाई नियमितपणे राखली आहे.
=== 

या यशोगाथेची सविस्तर बातमी १४ - १५ जून रोजी महाराष्ट्रातील विविध भाषक वर्तमानपत्रात आणि प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाली. मी आधी ऐकली ती १५ जूनच्या आकाशवाणीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये. त्यानंतर इतर प्रसारमाध्यमात ऐकली, बघीतली आणि वाचलीही. काही वृत्तपत्रांनी त्या बातमीच्या शीर्षकात वापरलेल्या 'ट्याहां' या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले. बातमीमध्ये 'ट्याहां' या शब्दाचा वापर दुर्मिळात दुर्मिळ म्हणायला हवा. वेगवेगळ्या प्रसारमाध्यमात एकाच आशयाची बातमी वाचून आणि त्यातही त्या 'ट्याहां' या लक्षवेधी शब्दाचा वापर बघून या बातमीचे प्रसिद्धीपत्रक असावे, असा अंदाज मला आला. प्रसिद्धीपत्रक असल्यास ते नायर रुग्णालयाने किवा महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने पाठविले असणार हाही अंदाज आला म्हणून ‘बातमी मागील बातमी’ कळण्यासाठी महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातील श्री. गणेश पुराणिक यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा जनसंपर्क विभागातील अधिकारी - कर्मचा-यांना ‘प्रेसनोट’ तयार करताना  कधीकधी अक्षरश: एका शब्दासाठी घ्यावी लागणारी काळजी, संशोधन आणि करावा लागणारा पाठपुरावा, याची याची एक केस स्टडीच हाताशी आली !
..
‘कोविड’ विषय खूप संवेदनशील असल्यामुळे तपशिलात काही चूक होऊ नये अशी खबरदारी घेणे प्रसिद्धीपत्रक तयार करणा-यांना आवश्यकच होते. सध्याच्या काळात अत्यंत ‘बिझी’ असणा-या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्या कडून माहिती मिळवण्याचे आव्हान जनसंपर्क अधिका-यांपुढे होते. तर डॉक्टरांनी वैद्यकीय भाषेत दिलेली माहिती साध्या सोप्या भाषेत मांडणे हे दुसरे एक आव्हानही होतेच ! अर्थात अनेक राज्यांएवढा पसारा असणा-या मुंबई महापालिकेतील जनसंपर्क अधिका-याला वैद्यकीय, अभियांत्रिकी, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, प्रसूतिगृह, स्मशानभूमी, मैदाने, कत्तलखाना, उद्याने, प्राण्यांचे दवाखाने, कायदा, सांस्कृतिक, जनगणना, फायर ब्रिगेड, नाट्यगृहे, आर्थिक बाबी, प्रदूषण, बाजार, इमारती, वीज पुरवठा, परिवहन, आपत्ती व्यवस्थापन अशा नानविध विषयांवरील प्रेसनोट कराव्या लागणे स्वाभाविक आहे. त्याचबरोबर या विषयांचा ‘बेसिक’ अभ्यास असणेही गरजेचे आहेच. 
..
तर त्या दिवशी म्हणजेच १३ जून च्या रात्री नायर रुग्णालयात कोविड बाधित मातांच्या प्रसुतींनी ३०० चा टप्पा ओलांडला होता आणि तीनशेच्या वर बाळांचा सुखरूप जन्म झाला होता. त्यात एका तिळ्यासह जुळ्या बाळांचाही समावेश होता. पुराणिकांनी प्रसिद्धीपत्रक तयार करण्यासाठी रुग्णालयातल्या डॉक्टरांशी बोलून आणि ‘बेसिक’ माहिती घेऊन बातमीचा कच्चा मसूदा तयार केला, तेव्हा रात्रीचे १०:०० वाजले होते. त्यामुळे इतक्या उशीरा बातमी पाठवण्यापेक्षा दुस-या दिवशी सकाळी बातमी पाठवणेच योग्य असा विचार करुन आणि हाताशी मिळालेल्या जास्तीच्या वेळेचा सदुपयोग करायचे त्यांनी ठरवले.
..
सध्याच्या तणावाच्या वातावरणात ही शुभ वार्ता खरीच. ती रुक्षपणे न देता थोडी आत्मीयतेने द्यावी,  म्हणजे वाचणाऱ्या/ ऐकणाऱ्या चेहऱ्यावर हलकीशी तरी 'स्मित रेखा' उमटावी म्हणून श्री. पुराणिक यांनी बातमीच्या 'लीड' मध्ये आणि शीर्षकामध्ये 'ट्याहां’ या शब्दाचा उल्लेख करायचं ठरवलं आणि इथून सुरु झाली ‘ट्याहां’ ची दुसरी कहाणी.
.. 
‘ट्याहां’ ची दुसरी कहाणी 
नवजात बालकाच्या रडण्याच्या आवाजाला मराठीत देवनागरी लिपीत लिहायचे कसे? पुराणिकांनी त्यांच्याकडे असलेल्या काही शब्दकोशांमध्ये 'ट्याहां’ शब्द शोधला, पण त्यात तो शब्द सापडला नाही. त्यानंतर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी श्री. पुराणिक यांनी सहा वेगवेगळ्या प्रकारे तो शब्द लिहून काढला. पण त्यापैकी योग्य पद्धत कोणती ते ठरवणार कसं? ध्वनी-आधारित शब्द अर्थात इंग्रजी मध्ये onomatopoeia या प्रकारातील शब्द लिहिणे, हे तसे किचकट काम. या प्रकारातले शब्द अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे लिहिले जातात. ‘ट्याहां’ हा देखील त्यातीलच एक शब्द.  
..
त्यानंतर श्री. पुराणिक यांनी परिचित आणि मित्रांना तो शब्द विविध प्रकारे लिहून 'व्हॉट्स अप'ने पाठवला आणि तो शब्द लिहिण्याची योग्य पद्धत कोणती? अस विचारलं. हाच संदेश त्यांनी काही 'व्हॉट्स अप ग्रुप' मध्येही 'पोस्ट' केला. हे सगळे मिळून जवळ जवळ ६०० व्यक्तींपर्यंत तो संदेश पोहचला. यामध्ये कवी, लेखक, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक असे विविध क्षेत्रातील व्यक्ती होत्याते.  
..
रात्री उशिरा पाठवलेल्या संदेशांना दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत प्रतिसाद मिळेल, असं त्यांना वाटलं होतं. पण त्यांना लगेचच उत्तर मिळायला सुरवात झाली. काही मित्रांनी १३ जूनच्या शनिवार रात्रीचा उल्लेख करत, कुठे काय पार्टीत वगैरे आहेस की काय? असे उलट प्रश्नही गमतीने विचारले.  तर काहींनी त्या शब्ब्दाला अनुरूप विनोदी ऑडिओ - व्हिडीओ पाठवले. पण काहींनी मात्र अत्यंत गंभीरपणे भाषाभ्यासी प्रकारची उत्तरेही पाठवली. १३ जून ला इतक्या उशिरा रात्री त्यांना प्रतिसाद मिळाला, हे देखील विशेषच. ह्या अश्या प्राप्त झालेल्या सुमारे २०० संदेशातून वाट काढत त्यांनी ५ सल्ले 'सेमी फायनल' ला टाकले.   हे सगळे होता-होता रात्रीचे १:३० वाजले होते. यापैकी ४ मान्यवरांनी पाठवलेल्या उत्तरात एकच सामान धागा होता, जो म्हणजे 'ट्याहां' अशा प्रकारे सदर शब्द लिहिण्याचा.  
..
सुमारे ३०० सल्ले किंवा प्रतिक्रिया पुराणिकांना मिळाल्या. पण त्यातले पाच ‘ट्याहां' पुराणिकांना योग्य असल्यासारखे वाटले. विशेष म्हणजे त्या पाच पैकी चौघांनी एकाच प्रकारचा सल्ला दिला होता. हे चौघेही आपापल्या क्षेत्रातले दिग्गज.  यामध्ये दोन ज्येष्ठ साहित्यिक, दोन पत्रकार आणि एका इतिहासाच्या प्राध्यापकांचा समावेश होता.  विशेष म्हणजे इतिहास विषयात पीएच. डी. साठी संशोधन करीत असणारे अधिव्याख्याते प्रा. राजू घोलप यांनी तर मोल्सवर्थच्या ऑनलाईन मराठी-इंग्रजी शब्दकोश मध्यरात्रीनंतर पाहून त्याचा इंग्रजीत अर्थ ३४४ क्रमांकाच्या पानावर असा दिला असल्याचेही कळवत त्याचा 'स्क्रीन शॉट'ही पाठवला!.  
..
मराठी भाषेतील अनेक शब्दकोशांमध्ये न सापडलेला 'ट्याहां' हा शब्द मोल्सवर्थसारख्या मातृभाषा मराठी नसणा-या पण मराठी भाषेवर मनस्वी प्रेम करणा-याच्या शब्दकोशात आजपासून सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी असणे विशेषच !  नाही म्हणायला 'मराठी शब्दरत्नाकर' सारख्या काही शब्दकोशांमध्ये या शब्दाची नोंद अवश्य आहे. पण प्रत्येक मराठी माणसाच्या संवादाची सुरुवात ज्या शब्दाने होते, तो 'ट्याहां' हा शब्द आज अनेक शब्दकोशांमध्ये तसा दुर्मिळच.  मोल्सवर्थच्या शब्दकोशात मात्र तो आवर्जून आहे. या शब्दकोशात 'ट्याहां' ची नोंद आहे, ती अशी :  "ट्याहां ṭyāhām, ट्याहां ṭyāhām, ट्याहां ṭyāhām ad Imit. of the crying of a little child. v रड, कर. ट्याहां, ट्याहां ट्याहां ṭyāhām, ṭyāhām ṭyāhām.” 
..
वर्ष १८५७ मध्ये मोल्सवर्थ आणि त्यांच्या हाता खालच्या सात संस्कृत-मराठी शास्त्रींनी संपादित केलेल्या शब्दकोतल्या ६०,००० हून जास्त शब्दामध्ये असलेला हा ‘ट्याहां’ आतापर्यंत किती लोकांनी अचूक लिहिला असेल? पण या ३०६ बाळांच्या निमित्ताने एकाच दिवशी असंख्य वाचकांनी तो आता पुन्हा एकदा वाचला. 
..
    जेम्स थोमस मोल्सवर्थ यांचा मराठी-इंग्लिश शब्दकोश १८५७ मध्ये 'बॉम्बे एज्युकेशन सोसायटी' प्रेस मध्ये प्रथम प्रसिद्ध केला. सन १८१५ मध्ये स्थापन झालेली ही 'बॉम्बे एज्युकेशन सोसायटी' आजही कार्यरत आहे.  पाच वर्षांपूर्वी या सोसायटीने आपला २०० वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला होता.  याच सोसायटीने प्रकाशित केलेल्या मोल्सवर्थच्या शब्दकोशाची ऑफसेट प्रत १९७५ मध्ये पुण्याच्या शुभदा सारस्वत प्रकाशनाचे श्री. शरद गोगटे यांनी प्रकाशित केली. 
..
त्यानंतर आजतागायत मोल्सवर्थच्या शब्दकोशाचे सहावेळा पुनर्मुद्रणही झाले आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व मोठ्या ग्रंथालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये मोल्सवर्थचा शब्दकोश आज उपलब्ध आहे. तर अमेरिकेच्या शिक्षण खात्याने दिलेल्या आर्थिक मदतीमुळे या शब्दकोशाची online आवृत्ती काही वर्षांपूर्वी विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आली. ती ऑनलाईन आवृत्ती https://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/ या लिंकवर उपलब्ध आहे.
..
वर्ष १९७५ मध्ये श्री. शरद गोगटे यांनी मोल्सवर्थच्या शब्दकोशाची पहिली ऑफसेट प्रत प्रकाशित केली, तेव्हा मी यू. एन. आय. अर्थात 'युनायटेड न्यूज ऑफ इंडिया' या वृत्तसंस्थेत कार्यरत होतो. तेव्हा त्या शब्दकोशाच्या प्रकाशनाची बातमी करण्याचे काम मला सोपविण्यात आले होते. तेव्हापासून या शब्दकोश आणि मोल्सवर्थशी जुळलेला ऋणानुबंध आजही कायम आहे. आजही माझ्या टेबलवर कम्प्युटर शेजारी हा शब्दकोश ठेवलेला आहे.  जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांना त्यांच्या दिडशेव्या स्मृती शताब्दी निमित्त भावपूर्ण आदरांजली ! 


प्रा. डॉ. किरण ठाकूर
फ्लेम विश्वविद्यापीठ, पुणे
२२.०७.2020
===