(The article is published also at Bharati's Narmada Parikrama blog)
माझी आणि भारतीची नेमकी ओळख कधी झाली ते आता नक्की आठवत नाही. भारती
म्हणजे भारती ठाकूर. नर्मदा परिक्रमेवरचे ‘नर्मदा परिक्रमा – एक अंतर्यात्रा ’ हे तिचे पुस्तक आहे. भारती, उषाताई पागे आणि
निवेदिता म्हणुन त्यांची एक मैत्रीण – अशा तिघींनीच संपूर्ण नर्मदा परिक्रमा
चार-सहा महिने चालुन केली होती. त्यावरचे तिचे हे अत्यंत साधे-सरळ आणि प्रांजळ
वर्णन आहे. एवढी परिक्रमा केली म्हणुन कुठलाही दंभ नाही, की अभिनिवेश नाही.
भारतीइतकेच नितळ-आरसपानी असे तिचे हे नर्मदेकाठचे प्रवासवर्णन. पण हे पुस्तक वगैरे
नंतरचे. माझी तिच्याशी झालेली ओळख ही त्याआधीची. बहुधा माझा कुठलासा लेख लोकसत्तात
वाचून तिने मला शोधून काढून फोन केला होता. ‘मी तुमचे लेख आवर्जुन वाचते. छान लिहिता. नेहमीच
तुमच्या लेखांची वाट बघत असते. वगैरे.’ हे
देखील तसे नित्याचे. कुणी खूप मनापासून फोन करतात. आवडल्याचे आवर्जुन सांगतात,
आपणही ते ऐकतो, क्षणभर सुखावतो, पण दिवसभराच्या धकाधकीत ते मागे पडते. ती ओळख
तेवढ्यावरच विरुन देखील जाते. पण अशी क्षणिक ओळख होऊनही काही नाती दृढ होतात, तसे
भारतीच्या बाबतीत घडले.
मागच्या महिन्यात भारतीकडे गेले होते तर माझ्याच लक्षात
आले की मध्यप्रदेशात मंडलेश्वरजवळील लेपा गाव माझ्या नेहमीच्या वाटेवर नसूनही मी एव्हाना
तब्बल पाच वेळा लेपाला जाऊन आले आहे. मधली सहा वर्ष मी स्वत: मध्यप्रदेशात,
भोपाळला रहायला होते. मलाही कामानिमित्त मध्यप्रदेशात खोलवर गावा-गावात जाण्याचा
योग आला. त्यातच भारतीशी प्रत्यक्ष भेट झाली. तिचे काम पाहिले. नियमित फोन नसतो,
पण आता भारतीशी झालेली ओळख खंबीर पायावर उभी आहे. मध्ये कितीही काळ गेला तरी फोन
करताच पुन्हा त्या क्षणापासून मधला काळ सांधला जातो.
भारती ठाकूर कोण आणि तिची ओळख मी का करुन देत आहे असा प्रश्न एव्हाना
मनात आलाही असेल. तर भारती मुळची नाशिकची, नर्मदा परिक्रमा करता करता महेश्वरपाशी
आली. परिक्रमेदरम्यान नर्मदाप्रकल्पामुळे विस्थापित झालेली गावे तिला दिसत होतीच.
अशाच कुठल्याशा गावात शाळा सुरु करण्याचा
ध्यास तिच्या मनाने घेतला. नाशिकमधले सुखवस्तू जीवन सोडून, भरभक्कम पगाराची नोकरी
सोडून काट्याकुट्यात, नर्मदेकाठच्या लोकांच्या मुलांना शिकवण्यासाठी ती, नाशिक आणि
तिची माणसे सोडून महेश्वरनजिक आली. परक्या गावात, परक्या लोकांत राहिली. त्यांना
विश्र्वास दिला, मुलांना शिकवण्याचे व्रत घेतल्यासारखे पायपीट केली.
आज
गावागावातल्या शाळांत मिळुन तिच्यापाशी चौदाशे मुले शिकत आहेत. शिक्षक आहेत. लेपा
गावात तिच्या नर्मदालय संस्थेची दुमजली वास्तु आहे, पसारा वाढला आहे. वाढत आहे.
तिने गावात शाळा काढावी म्हणुन आग्रहाने गावकरी तिला बोलवत असतात. शाळेपासून दूर
पळणारी मुले शाळेकडे धावत येतात. आणि हो, तिच्या शाळांचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या
शाळांमधली मुले शाळेत यायला निघाली, चौकात एकमेकांना भेटली की गायला लागतात,
वाटेवर गातात, त्यांना घेऊन जाणा-या बसची वाट पहाताना गातात, बसमध्ये गातात, शाळेत
पोचली की गातात आणि शाळेतून घरी परत जाईपर्यंत गातच रहातात. भारती सांगते की इतर
शाळांमधून जेव्हा मुले रडत रडत शाळेत जातात तेंव्हा आमच्या शाळेतली मुले गात गात
जातात. पुन्हा सगळेच गात असल्यामुळे नविन येणा-या मुलाला तसा रडायला वाव मिळत
नाही.
भारतीच्या या शाळाही दिवसभरात केवळ काही तासाच्या, त्यानंतर मुले आपापल्या
कामाला जाऊ शकतात. मुलं गुरं चरायला गुरांच्या पाठी जातात, घरात आपल्या भावंडांची
पाठराखण करतात, शेतात आई-वडिलांसोबत जातात, शाळा नसती तर जे काही त्यांनी दिवसभरात
केले असते ते सर्व काही करतात. दिवसभराच्या कामाला मुलेही हातभार लावत असल्यामुळे
पालकांचीही तक्रार नाही, मुलेही शाळेत डांबून रहात नाही. गणवेशाची सक्ती नाही.
कारण युनिफॉर्म वगैरेचे चोचले कोणालाच परवडण्यासारखे नसतात.
आपल्या काही शहरी कल्पना असतात. एकतर अलिकडे एक आणि दोन मुलांच्या
मर्यादित कुटुंबामुळे आपण मुलांचे लहानपण खूपच लांबवले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी
आई-बापांनी वाटेल ते कष्ट करावेत, प्रचंड पैसे उभे करावेत. मुलांना शिकवावे,
परदेशी धाडावे, लग्न करुन द्यावे. त्यानंतरही होता होईल तेवढे परदेशी फे-या मारुन त्यांच्या
मागे उभे राहावे, थोडक्यात आपल्याला जी ओढाताण करावी लागली ती आपल्या मुलांना
करावी लागू नये अशी आताच्या रिटायरमेंटला पोचणा-या पिढीची मानसिकता आहे. ऐंशी-नव्वदच्या
दशकात शिक्षण-लग्न ही ज्याची त्याची जबाबदारी होती. ती जबाबदारी आई-वडिलांची नव्हती
आता मात्र ती आई-वडिलांची जबाबदारी झाली आहे. आणि ह्याला मुले नाही तर आई-वडिलच
जबाबदार आहेत. सहाजिकच त्यामुळे लहान वयात, आपल्या तर सोडाच, पण इतरही कुठल्या मुलांनी काम करणे आपल्याला नैतिक
दृष्ट्या साफ नामंजुर असते.
ह्याच विचाराला सुरुंग लावत भारतीच्या शाळांमधून
येणारी मुले दिवसभर शाळांमधुन डांबली जात नाहीत. काही तास ती शिकतात आणि मग
आपापल्या कामाला निघून जातात, जे काम त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक
आहे त्या कामाला ती लागतात. कारण गरीब कुटुंबात प्रत्येकाने उदरनिर्वाहासाठी कष्ट
करणे आवश्यक असते. मुलांना शाळेच्या वाटेला लावायचे म्हणजे त्याचे काम बंद ही त्या
लोकांच्या दृष्टीने चैन आहे जी गरीब कुटुंबाला परवडणारी नसते. एकेकदा सत्य स्विकारण्यासाठी
मोठीच मोडतोड करावी लागते.
शिक्षणाने आपण नेमके काय साधतो ? आजवर शिकलेले किती आणि कुठले विषय
आपल्या पुढल्या आयुष्याला उपयोगी ठरले आहेत ? मुळात शिक्षण म्हणजे मुलाने नेमके
काय शिकायला हवे ? एकाच प्रकारचे सरधोपट शिक्षण प्रत्येक मुलाला देणे आवश्यक आहे
का ? त्यामुळे तो जगायला लायक होतो का? शहरातून उच्चवर्गिय मुले शिकतात तेच शिक्षण
गावागातल्या मुलांना देणे योग्य आहे का? शिक्षण ग्रहण करण्यात मुलांच्या पोषणाचा,
मेंदूच्या विकासाचा थेट संबंध असतो त्यामुळे जे विषय शहरी उच्चवर्गिय मुले ग्रहण
करु शकतात ते गावाकडची आर्थिक निम्नस्तरिय मुले ग्रहण करु शकतील का? दहावी-बारावी
बोर्डाच्या एकाच धारेतून घालवताना जर मुले कॉपी करुन पास होण्याचा मार्ग स्विकारत
असतील तर चुक फक्त मुलांची आहे की राबविलेल्या शिक्षणव्यवस्थेची? शिक्षणपद्धतीचा
उभा-आडवा छेद घेत आपल्या शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल करायला हवा आहे का? विशेषत:
ग्रामीण भारताला आपल्या अर्थव्यवस्थेशी जोडून घ्यायला आपल्या साचेबंद शिक्षण
पद्धतीत बदल करायला हवा आहे का ? बेरोजगारी आणि भरताड शिक्षण हे परस्पर पूरक आहेत,
हे कळणे आणि त्यात बदल घडविणे हे जरुरीचे नाही का?
भारतीच्या शाळांमधली सर्व मुले रोज घरी जातात पण काही जण, ज्यांची
इच्छा असेल अशी काही मुले, भारतीच्याकडे लेपाच्या घरात रहात आली आहेत. मुलभूत
शिक्षण तर त्यांनाही दिले गेले पण त्या नंतर ह्या मुलांनी व्यवसायभिमुख शिक्षण
घेतले. दहावी-बारावीची परिक्षा पास झालेच पाहिजे हा निर्बंध नाही.
लेपाला
भारतीच्या घरी त्या रात्री आम्ही मुलांबरोबर बोलत होतो. होळीच्या दिवसातली छान चंद्राची
रात्र. मुलं आमच्याभोवती गोलाकार बसलेली. निशिगंध-मधुमालतीचा सुवास हवेत दरवळत
होता. जागा तशी निर्जन पण भीतीदायक नाही. आपण इथे लेपाच्या घरी कसे आलो ते
प्रत्येक मुलगा सांगत होता. प्रत्येकाची चित्तरकथा. मुलांमध्ये कुणी घर बांधण्यात
प्रविण होते तर कुणी इलेक्ट्रिशियनचे काम करण्यात वाकबगार. कुणी घरातले सर्व
सुतारकाम केलेले तर कुणी वेल्डिंगचे काम करुन दिलेले. एवढेच काय, अजय नावाचा एक
लहानसर चणीचा मुलगा रहातो तिच्याकडे. भारतीच्या गोशाळेचे सगळे काम, म्हणजे गर्भार
गाईची सुटका करण्यापर्यंत सगळे काम अजय एकटा मेहनतीने करतो.
मनात आले, काय गरज आहे
या मुलांना बारावीच्या परिक्षेची? अजय खरंतर उत्तम पशुवैद्य होईल पण पुन्हा त्या
शिक्षणासाठी आपल्या मार्गात दहावी-बारावी-नेट-सेट-जेटचे अडसर आहेत. माणसाचा कल
महत्वाचा नसतोच. शंकरचे गणित उत्तम आहे, गोलु सगळ्यात वाकबगार आहे. स्वैपाक करण्यापासून
आर्थिक व्यवहार पाहण्यापर्यंत भारतीचा डोलारा सांभाळण्यात दिग्विजय भैय्याप्रमाणे त्याचाही
महत्वाचा वाटा आहे असे ती कौतुकाने सांगते. मुळात मध्यप्रदेशची माणसे आक्रमक,
आक्रस्ताळी नाहीत. सौम्य, मनमिळावु, अतिथ्यशील. त्यातून नर्मदेकाठी राहणारी तर
परिक्रमावासियांच्या स्वागताला नेहमीच उत्सुक. आमच्या भोवताली बसलेली ती सर्व मुले
इतकी आदबशीर आणि जबाबदार की त्यांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांचा ताळमेळ घालु
लागलो तर चक्रावून जावे.
भारतीकडे भावना-शिवानी-ट्विंकल-पूजा अशी दहा-बारा वयाच्या
मुलींची चौकड आहे. घरातल्या मुलांपेक्षा या मुली सगळ्या लहान आहेत पण एकेकीचे गळे
असे गोड की ऐकत रहावे. गाणे भारतीतच आहे त्यामुळे मला वाटते ते सगळ्यांमध्ये उतरले
आहे. ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला पासुन नर्मदास्तोत्र
ते गीतेच्या अठराव्या अध्याया’ पर्यंत सगळे त्यांना
पाठ. ‘हं, सुरु’, म्हंटले की कुठेही सुरु होतात. ड्रमवर शिवानी,
पेटीवर भावना आणि तबल्यावर त्यांचा दिग्विजय भैय्या. ह्या मुलींचे, त्यांच्या आईचे
हाडुस-तुडुस होणारे पूर्वआयुष्य आणि आताचे सरस्वती जिभेवर नांदणारे आयुष्य याला
नेमके काय म्हणावे ? भाग्य, नियती,
प्रारब्ध की अजुन काही? म्हटलं तर या सगळ्याला शब्द आहेत, म्हंटलं तर आयुष्य एक वाहती
नदी.
भारतीकडेही इथल्या अनुभवांचे भांडार. उग्र रुपाच्या तलवारधारी साधुने तिला
आपल्या आश्रमाची जागा कशी दिली, नको असलेल्या गोशाळेची जबाबदारी तिच्याकडे कशी आली
ते अगदी अलिकडे भट्यानच्या शाळेपर्यंतचा तिचा सगळाच प्रवास तिच्याच तोंडून ऐकावा
असा.
होळीच्या सुमारास चार दिवसांच्या सुट्टीत खास नर्मदेला भेटायला आणि
अनुषंगाने भारतीलाही भेटायला महेश्वर-मंडलेश्र्वरला जाणे झाले. लेपाला माझ्या
यापूर्वीदेखील फे-या झाल्या होत्या ख-या ,पण भारतीकडे रहायला अशी मी प्रथमच गेले
होते. महेश्वरला घाटावर होतो की भारतीचा फोन आला, ‘येताच आहात तर चार-साडेचारपर्यंतच पोचा. म्हणजे
दिवसाउजेडी भट्यानची शाळा बघता येईल. ती जागाही खूप छान आहे. तुम्हाला नक्की
आवडेल.’ महेश्वर गाव तसे यथा-तथाच पण अहिल्याबाईंचे घाट
आणि नर्मदा म्हणजे जणु विटक्या सुती साडीला भरर्जरी महेश्र्वरी मुलायम पदर. घाटावरुन
पाय निघत नाही आणि नर्मदा बघुन मन भरत नाही. भारतीच्या सांगण्यामुळे घाटावरुन
लौकरच निघालो. लेपाचा रस्ता नेहमीप्रमाणे चुकत-विचारत तिच्याकडे येऊन पोचलो.
गोलु-शंकर, दिग्विजय सगळे अगत्याने भेटले. आम्ही लगेचच भट्यानला पोचलो.
महेश्वर
समोर ठेवून पलिकडच्या तिरावर, जरा उंचावर अशी ही भारतीची भट्यानची शाळा. गावातून
आमची गाडी जाताना गावातली सगळी मुलं भरारा आमच्यासोबत शाळेपाशी पोचली.
भावना-शिवानी-माधव-ट्विंकल ही सगळी लेपाची बच्चेकंपनी आमच्या बरोबर होतीच.
भट्यानच्या
शाळेशेजारी कुणी एक भुतानचा साधु कुटी बांधुन रहातो. भारतीच्या शाळेच्या प्रवाहात
आता तोही सामील झालेला आहे. खूप वर्षांपूर्वी भुतानवरुन निघून जागा शोधत शोधत
नर्मदेच्या काठी भट्यानला आला आणि स्थायिक झाला. भट्यानचे गावकरी दिवसभर शेती
करतात, नावाड्याचे काम करतात, मोलमजुरी करतात आणि संध्याकाळ झाली की साधुबाबांकडून
वेदांत शिकतात. सगळेच अद्भुत. काहीतरी बोलता बोलता साधु बाबा म्हणाले, ‘शिवता शिवता कापड आणि सुई-धागा बाजुला ठेवून
उठावे आणि परत येऊन पुन्हा सुई-धागा उचलुन त्याच टाक्यावरुन पुढे टाके घालणे सुरु
करावे असा हा जन्म-मृत्यूचा आपला प्रवाह. ’
भट्यान, तिथली मुलं, साधुबाबा, नावाडी आणि
वेदांत... नर्मदेच्या पाण्यावर सुर्यास्ताचे रंग !
नर्मदा ही एक विलक्षण नदी आहे. जो तिच्यापाशी येतो. तो तिच्यात गुंतला
नाही असे होत नाही. प्रत्येकाची श्रद्धा नदीपाशी. महाराष्ट्रातल्या नाशिकमधुन येऊन
नर्मदा परिक्रमा करता करता नर्मदेच्या विस्थापित गावातल्या निम्नस्तरिय लोकांच्या
मुलांसाठी एकटीच्या हिम्मतीवर शाळा चालवणारी भारती खरंच कौतुकास्पद ठरते.
महाराष्ट्रात
तर जागोजाग अशी काम खूपजणं करत आहेत. त्याची माहितीही लोकांपर्यंत पोचते. लेपामधुन
निघता निघता भारतीच्या नर्मदालय संस्थेला काय सहयोग देता येईल याचा माझ्या मनात शोध
चालु होता. अशा कामांना आर्थिक मदत तर लागतेच. भारतीचे म्हणणे आहे की ‘नर्मदामैय्या करवून घेत आहे, दर महिना काही ना
काही होऊन आजवर गेला आहे यापुढेही होईल.
आर्थिक मदत मिळाली तर हवीच आहे मात्र अजुन
एक मदत हवी आहे ती म्हणजे या मुलांना कपडे नाहीत. स्वच्छ, चांगले, सुती कपडे
मिळावेत.’ पैसा, कपडे, खेळणी, धान्य हे तर प्रकल्पांना आवश्यकच
आहे. पण अशा कामांना लागते ती माणसांची जोड. तिच्या बोलण्यात ती उणिव जाणवत होती, माझ्यानंतर किंवा माझ्याबरोबर हा
डोलारा कोण सांभाळेल, हा प्रश्र्न ! मी
भारतीला म्हंटलं होते की माझ्या काही मित्र-मैत्रीँणीपर्यंत मी हे नक्की पोचवीन - ज्यांची
क्षमता आहे शिकवण्याची, जे संवेदनशील आहेत, जे शिक्षणाचा मुलभूत विचार करतात, आपला
किमान काही वेळ जे या मुलांना देतील, जमेल तितकी तुला साथ देतील – असे लोक !
तर जनांचा हा प्रवाह मी मध्यप्रदेशात लेपा गावापाशी नेऊन सोडत आहे...
राणी दुर्वे
ranidurve@gmail.com
1 comment:
Sir,
Thanks for sharing this interesting article. Feel like going and visiting the place.
Thanks
Sagar Gokhale
Post a Comment