Wednesday 9 December 2015

सुभाष नाईक यांच्या कडून 

मराठी भाषा : आपणच ती घडवणार आहोत, बिघडवणार आहोत !

मराठी भाषेत अनेक अनावश्यक शब्दांचा शिरकाव, सुळसुळाट, धुमाकूळ सध्या चालू आहे आणि त्यातच आपण मोठेपणा मिरवत आहोत. असे मानले जाते की एखाद्या भाषेत परभाषेतील शब्द आले की ती भाषा वाढते, अधिक समृद्ध होण्यास मदत होते. आपल्या मराठीचे पाहता, अगोदर मुस्लिम व नंतर इंग्रजांच्या राजवटीमुळे मराठीत अनेक उर्दू, हिंदी व इंग्रजी शब्दांची भर पडली. काही हिंदी - इंग्रजी शब्द तर आपण रोजच्या जीवनात सरसकट मूळ मराठी शब्दांऐवजी वापरत आहोत. ते आपल्या अंगवळणी पडले आहे. तथापि अलीकडील स्वातंत्र्योत्तर काळात उत्तरेकडून सतत होत राहणा-या हिंदी भाषेच्या वर्चस्वामुळे मराठी भाषा आणखीच बिघडून मूळ अर्थ न पाहता चुकीचे शब्द वापरले जात आहेत; किंबहुना हेच चुकीच्या आशयाचे शब्द बरोबर आहेत हे मान्य झाले आहे. हा अनावश्यक शब्दांचा शिरकाव, सुळसुळाट, धुमाकूळ अत्यंत असह्य होत आहे. काही  शब्द आणि त्यांचे केले जाणारे दैनंदिन जीवनातले उपयोग खाली देत आहे. यावर आपणच काय तो उपाय करायचा आहे.
(१) संपन्न : आज कोणताही समारंभ, सोहळा झाला, असे न म्हणता तो समारंभ संपन्न झाला असे म्हणतात. नुसता "झाला" असे म्हणण्याने कोणता गैर अर्थ व्यक्त होतो ?
(२) रणनीति : या शब्दाचा साधा सरळ अर्थ - युद्धातले डावपेच - असा आहे. पण हल्ली निवडणुकीची रणनीति ठरवली जाते.  केवळ डावपेच का म्हणत नाहीत ?
(३) षडयंत्र : कट, कारस्थान या शब्दांऐवजी हा शब्द !
(४) उपलब्ध : बाजारात अमुक एक गोष्ट मिळते अथवा नाही, तसेच अमुक तमुक व्यक्तीशी संपर्क होऊ शकला नाही, त्या व्यक्तीची भेट झाली नाही असे न म्हणता सरसकट ती गोष्ट, ती व्यक्ती उपलब्ध नाही असे सांगितले जाते.
(५) प्रयत्नशील : हा शब्द शासकीय निवेदनात येतो. अमुक गोष्टीसाठी प्रयत्न करत आहोत, असे म्हणायचे नाही. आम्ही प्रयत्नशील आहोत असे म्हटल्यावर काय फरक पडतो ?
(६) निर्धारित : ठरलेली वेळ, ठरलेली रेल्वे / बस गाडीची वेळ असे न म्हणता, निर्धारित गाडी आज उशीरा येत आहे, अशा रेल्वे स्थानकावरील घोषणा आपण रोज ऐकतो.
(७) बोजा : एखादी सवलत दिली पगारवाढ मान्य करण्यात आली तर त्याचा भार पडला असे म्हणायचे नाही; बोजा पडला, असे म्हटले तर त्याचा कोणता विशेष असा भार पडतो ?
(८) या संदर्भात : संदर्भ हा शब्द इंग्रजी reference  या शब्दाचा अर्थ असला तरी हल्ली काही गोष्टींबाबत असे न म्हणता त्या गोष्टीच्या संदर्भात असा उगाचच जड शब्द वापरतात. कोण ते आपण जाणता.
(९) जेणे करून : अमुक झाले तर तमुक होईल असे हल्ली म्हणायचे नाही. जेणे करून … असा मोठ्ठा शब्द वापरा बरे !
(१०)  अ‍ॅडमिट : एखाद्याला सरळ रुग्णालयात दाखल केले असे म्हटले तर ते चुकीचे आहे का ? हल्ली तर अ‍ॅडमिट केले असेच म्हटले जाते.
(११) प्रलंबित : हासुद्धा शासकीय निवेदनाचा खाक्या ! मागण्या लांबणीवर पडल्या, प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला नाही असे म्हणण्याऐवजी हा संस्कृत शब्द वापरला की कोणाला कळत नाही, असे का वाटते ?
(१२) बोगस : बनावट वस्तू, बनावट पदवी यांचा सुळसुळाट झालाय, पण त्यासाठी साधा मराठी शब्द न वापरता इंग्रजी bogus या शब्दाचाच वापर केला जातो हे कोडे आहे.
(१३) आंदोलन छेडणे : पूर्वी लोक ( लोकं असे सुद्धा हल्ली लिहिले जाते !) आंदोलन करत होते, हल्ली मात्र लोक आंदोलन छेडतात म्हणे.
(१४) बेरोजगारी : बेकारी हा साधा व सोपा मराठी शब्द न  वापरता, बेरोजगारी या शब्दावर रोजगार मिळतो !
(१५) राबवणे : हा शब्द उपक्रम, मोहिमा, योजना यासाठी वापरतात. अमुक योजना राबवण्यात येत आहे, हा शब्दप्रयोग करणारे बडे बडे लोक त्यासाठी आपल्यासारख्यांना 'राबवतात' हे सांगणे नकोच.
आणखी कितीतरी अनावश्यक शब्द देता येतील. येथे थांबतो. आपणच आपली मराठी भाषा घडवणार आहोत, बिघडवणार आहोत.
-  मंगेश नाबर / ११ मे २०१५

['अंतर्नाद' मासिकाच्या दिवाळी  २०१५ अंकात प्रसिद्ध झालेले मूळ पत्र  ] 

1 comment:

Anonymous said...

लेखकानं ना.गो. कालेलकर या विख्यात भाषावैज्ञानिकांचे 'भाषा आणि जीवन' हे पुस्तक वाचल्यास कळेल की, शुद्ध-अशुद्धतेचा असा आग्रह हा 'अडाणीपणा' आहे. अडाणी हा शब्द कालेकरांनीच या संदर्भात वापरला आहे. वेगवेगळे शब्द वेगवेगळे अर्थ त्यांच्यासोबत आणत असतात, त्यामुळं कितीही शब्द 'बि'घडले तरी भाषेचं काहीच नुकसान होत नसतं. असं नुकसान होतं असं वाटणारेच भाषेचे मारेकरी असतात, कारण त्यांना भाषेचे प्रवाहीपण टाळून साचेबद्ध भाषा करायची असते. 'लोकं' शब्द शुद्ध व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचा असेलही, पण 'कोसला' या मराठी कादंबरीतील मैलाच्या दगडात सर्वत्र 'लोकं' असाच तो लिहिला असेल तर तो लोकांनी स्वीकारलाय असा त्याचा अर्थ होतो. असे अनेक शब्द लोकांच्या स्वीकारण्यावरच आवश्यक की अनावश्यक हे ठरत असते, अर्थ आणि शब्द यांचे अर्थाअर्थी काही नाते नसते, तसे ते लावणे भाषेला मारक ठरणारे आहे. 'दर्शक' म्हणजे दाखवणारा, पण 'दूरदर्शन'मुळे 'आपले दर्शक'मधील 'दर्शक' हा शब्द प्रेक्षक या अर्थ आता रूढ झालेला आहे, त्यात चूक असे काही नसते. बेकार-बेरोजगार, बोगस-बनावट-- इत्यादी उदाहरणे तर फारच बनावट आहेत, कारण बहुसंख्य मराठी बहुजनांनी स्वीकारलेल्या शब्दावर लेखकाचा आक्षेप असल्याचे त्यातून दिसते. भाषा बहुजनांच्या अर्थांनी चालत असते. अन्यथा ती रांगूही शकणार नाही. असो.