Monday, 29 March 2010

संगणकावर "युनिकोड मराठी' अनिवार्य करावे

संगणकावर "युनिकोड मराठी' अनिवार्य करावे
सकाळ वृत्तसेवा
Monday, March 29, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: abmss, computer, unicode marathi, chief minister, font

पुणे - महाराष्ट्रातील सर्व संगणकांवर मराठीतून लिहिता - वाचता यावे यासाठी राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक संगणकावर "युनिकोड मराठी' असणे अनिवार्य करावे, अशी मागणी 83व्या मराठी साहित्य संमेलनाने मुख्यमंत्र्यांकडे एका स्वतंत्र पत्राद्वारे केली आहे.

साहित्य संमेलन कॉर्पोरेट होताना मराठीतूनही संगणकावर परिणामकारक व्यवहार व्हायला हवेत, असा आग्रह धरला जात आहे. या साहित्य संमेलनात तीन-चार स्टॉलवर संगणकावरील मराठीच्या वापरासंबंधी मार्गदर्शन केले जात होते. याचा एक भाग म्हणूनच युनिकोड मराठीच्या अनिवार्यतेची मागणी संमेलनाने केली आहे.

रोमन लिपीचा कळपाटा (की बोर्ड) समान असल्याने इंग्रजीसाठी कोणताही फॉन्ट वापरला तरी चालते. मात्र मराठीत कळपाटा समान नसल्याने एक फॉन्ट दुसऱ्या संगणकावर चालतोच असे नाही. त्यामुळे मराठीतून संगणकावरील लेखनाला मर्यादा येत असत. ई-टपाल (ई-मेल) किंवा अनुदिनी (ब्लॉग) देवनागरीत लिहिल्यानंतर तो फॉन्टही पाठवावा लागत असे. मात्र आता युनिकोडमुळे मराठीतून लिहिणे - वाचणे सोपे झाले आहे. मात्र सर्व संगणकांवर युनिकोड मराठीसाठीचे ऑपरेशन सिस्टिममधील पर्याय कार्यान्वित केलेले नसतात. ते स्वतः करून घ्यावे लागतात. म्हणूनच राज्यात विक्री होणाऱ्या प्रत्येक संगणकावर युनिकोड मराठीसाठी ऑपरेशन सिस्टिममधील पर्याय कार्यान्वित करावेत, असा शासनाने नियम करावा आणि संगणकांची विक्री करणाऱ्यांवर व कार्यकारी प्रणालींचा पुरवठा करणाऱ्यांवर सक्ती करावी, असा आग्रह संमेलनाने धरला आहे.

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडेच माहिती व तंत्रज्ञानविषयक खाते असल्याने संमेलनातर्फे स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई, कार्याध्यक्ष उल्हास पवार व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. वि. भा. देशपांडे यांच्या स्वाक्षरीने या मागणीचे पत्र पाठविण्यात आले आहे. सायबर कॅफेमध्ये संगणकावर मराठी काम करण्याची सोय असणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक सहा महिन्यांपूर्वी निघाले आहे. त्यानंतर सामान्य प्रशासनाने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन युनिकोडची माहिती दिलेली आहे. मात्र सहा महिन्यांनंतरही या परिपत्रकाच्या अंमलबजावणीस सुरवात झालेली नाही, याकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशीही या पत्रात मागणी करण्यात आली आहे. संगणकावर मराठीत काम करणे कसे शक्‍य आहे, हे समजावून सांगणारी माहितीपत्रके संगणक विक्रेत्यांनी पुरवणेही बंधनकारक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. संमेलनात या मागण्यांचा "माध्यम तंत्रज्ञान आणि मराठी भाषा' या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. सुधीर गव्हाणे यांनीही मंचावरून उच्चार केला.

मराठीकरणाची चळवळ पूर्वीपासूनच सुरू
संमेलनातर्फे पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतानाच या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या स्टॉलवर रसिकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्याची मोहीमही सुरू होती. ठाण्यातील या संस्थेने मराठीकरणाची चळवळच सुरू केली आहे. मराठी युनिकोड वापरण्याची एक पुस्तिकाही त्यांनी प्रसिद्ध केली आहे. सी- डॅकतर्फे मराठी युनिकोड सुविधा आपल्या संगणकावर उतरवण्यासाठी (डाऊनलोड करण्यासाठी) एक विशेष चकती (सीडी) मोफत वाटण्यात येत होती. वेगवेगळ्या स्तरातील लोक मोठ्या उत्सुकतेने या विषयी माहिती घेताना दिसत होते. कोणत्याही संगणकावर सहज वापरता येण्याजोगा मराठी फॉण्ट "मराठी एडिटर'च्या शुभानन गांगल यांनी तयार केला आहे. जगात कोठेही "मराठी एडिटर'च्या साहाय्याने मराठीतून ई-टपाल पाठवणे आता शक्‍य होणार आहे. त्यासंबंधीची माहिती श्री. गांगल व यमाजी मालकर देत होते. तर मराठीतून दर्जेदार संकेतस्थळे (वेबसाईट्‌स) बनवणे शक्‍य असल्याची माहिती "मराठी वेबसाईट्‌स'तर्फे प्रसाद शिरगावकर देत होते.

No comments: