Friday 7 April 2023

आयुर्वेद आधारित वनस्पती रोखतात कर्करोग उपचाराचे दुष्परिणाम

 आयुर्वेद आधारित वनस्पती रोखतात कर्करोग

उपचाराचे दुष्परिणाम


पुणे विद्यापीठातील पी. एच्. डी. संशोधन
पुणे, एप्रिल ०७, २०२३- अश्वगंधा आणि शतावरी या सारख्या आयुर्र्वेदिक औषधांच्या सेवनाने कर्करोगाच्या केमोथेरपी उपचाराचे दुष्परिणाम रोखता येतात, हे उंदरांवर केलेल्या संशोधनाने अलीकडेच सिद्ध झाले आहे. सदर संशोधन पुणे विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभागातील प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. कल्पना जोशी आणि वैद्य गिरीश टिल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आकाश सग्गम यांनी पी. एच्. डी. अभ्यासांतर्गत केले. हे संशोधन सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया येथे डॉ. सुनिल गैरोला आणि डॉ. मनिष गौतम यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले.
या प्रयोगाचे उद्दिष्ट कर्करोगाच्या उपचारातील मुख्य दुष्परिणाम ‘मायलो-सप्रेशन’ यावर केंद्रित होते. हाडांच्या गाभ्यातून पांढऱ्या पेशी निर्माण होण्याची क्षमता लोप पावण्याच्या प्रक्रियेला मायलो-सप्रेशन असे म्हणतात. या पांढऱ्या पेशी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीचा अविभाज्य घटक असतात. उलटपक्षी, आयुर्वेदातील ‘रसायन’ संकल्पना शरीराची रोगप्रतिकारशक्ती इष्टतम राखण्यास मदत करते. या संकल्पनेला दुजोरा देणाऱ्या अश्वगंधा आणि शतावरी या वनस्पती मानवी शरीरात उत्तम रोगप्रतिकार करतात, हे विविध संशोधनातून सिद्ध झालेले आहे. डॉ. आकाश व त्यांच्या सहकाऱ्यांनी या वनस्पतींच्या रोगप्रतिकारक क्षमतेचा उपयोग उंदराच्या मायलो-सप्रेशनला रोखण्याकरता केला.
या प्रयोगात कर्करोगाच्या उपचारात नेहमी वापरल्या जाणाऱ्या पॅक्लिटॅक्सेल नामक औषधाने उंदरामधील मायलो-सप्रेशन उत्पन्न केले गेले. त्यानंतर अश्वगंधा आणि शतावरी या वनस्पतींच्या अर्क सेवनाने हे मायलो-सप्रेशन यशस्वीपणे रोखले गेले. पॅक्लिटॅक्सेल औषधामुळे प्राण्यांमध्ये दिसून आलेले इतर दुष्परिणाम उदा. थकवा, सांधेदुखी, आणि केसगळती यांनाही अश्वगंधा आणि शतावरीच्या अर्क-सेवनाने आळा बसल्याचे दिसून आले. या संशोधन प्रकल्पास भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे अर्थसहाय्य मिळाले. या संशोधनाचे सर्व निष्कर्ष फ्रंटीयर्स इन फार्माकॉलॉजी या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. (अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा). सदर पी. एच्. डी. प्रकल्प हे शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांच्या यशस्वी सहयोगाचे उत्तम उदाहरण आहे.
डॉ. आकाश यांनी आपल्या मुलाखतीत कर्करोगाच्या उपचाराचे दुष्परिणाम रोखण्याच्या आयुर्वेदाच्या क्षमतेला अधोरेखित केले. “या संशोधनाने आयुर्वेदातील रसायन संकल्पनान्वये राखल्या जाणाऱ्या प्रतीकारक्षमतेच्या समतोलास वैज्ञानिक पुष्टी दिली. ह्या संशोधनाचा पुढील टप्पा प्रत्यक्ष कर्करोगाच्या रुग्णांवर रसायन संकल्पनेचा स्वास्थ्यकारक उपयोग असू शकतो”, असे त्यांनी नमूद केले.
आयुर्वेद, कर्करोग विज्ञान, रोगप्रतिकारशक्ती, आणि माहिती तंत्रज्ञान यातून साकारणारी एकात्मिक स्वास्थ्यप्रणाली हे डॉ. आकाश यांच्या संशोधनाचे मुख्य विषय आहेत. या संशोधनाने समग्र आणि आंतरविद्याशाखीय उपचारपद्धतीचा जागतिक कल अधोरेखित झाला आहे.
पी. एच्. डी. संशोधन:
डॉ. आकाश सग्गम
ई-मेल: akash.sgm@gmail.com
संशोधन मार्गदर्शक:
प्रा. भूषण पटवर्धन
राष्ट्रीय प्राध्यापक शास्त्रज्ञ – आयुष
प्रतिष्ठित प्राध्यापक
आरोग्यशास्त्र विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
पुणे
ई-मेल: bpatwardhan@gmail.com
आणि
प्रा. कल्पना जोशी
विभाग प्रमुख
जैवतंत्रज्ञान विभाग
सिंहगड इंजिनीअरींग महाविद्यालय
पुणे
ई-मेल: kalpanajoshi1788@gmail.com

वार्तालेखक:
प्रा. डॉ. किरण ठाकूर
निवृत्त विभागप्रमुख
संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
पुणे
ई-मेल:g drkiranthakur@gmail.com
--

No comments: