सदाशिव आबाजी जकाते
म्हणजे मोठे विलक्षण व्यक्तिमत्व होते. माझ्या पन्नास- पंचावन्न वर्षांच्या
पत्रकारितेच्या कारकीर्दीत असा पत्रकार मी पाहिला नाही. त्यांचे माझे बीट
वेगवेगळे. पत्रकारितेची भाषा वेगळी. ते ‘संध्या
‘ या सायंदैनिकात काम करायचे. त्या वेळेच्या छोट्याशा
पुण्यातल्या गुन्हेगारी बातम्या ते कव्हर करीत.
मुख्यत: मंडई आणि आसपासच्या पेठा, त्यातही तेथे घडलेल्या
छोट्या मोठ्या क्राईमच्या बातम्या हा त्यांचा हातखंडा
विषय असायचा.
ससून हॉस्पिटल मधील पोलीस ठाणे, रेल्वे
स्टेशन पोलीस चौकी, फरासखाना आणि आसपासच्या पोलीस चौक्या,
तेथील कॉन्स्टेबल पासून इन्स्पेक्टर ए सी पी, डी
सी पी, सी पी अशा सगळ्या साहेब लोकांशी त्यांची गट्टी
असायची. सकाळी बहुधा खूप लवकर ते घरून बाहेर पडत असावेत. रात्री घडलेल्या
गुन्हेगारी विषयक म्हणजे क्राईम संबंधीच्या घटना प्रत्येक पोलीस चौकीवर
जाऊन किंवा फोनवरून ते मिळवायचे. दुपारी
एक दोनपर्यंत त्या कागदावर लिहून उपसंपादकाकडे आणून द्यायचे. मधे केव्हा तरी जेवायचे. परत बाहेर पडून नंतर
घडलेल्या बातम्या मिळवून द्यायचे. दोन-पानी छोटे दैनिक “भुंगा”
नंतर “भोंगा” स्वतः
कंपोज करून तो छापून झाला की पुन्हा बाहेर पडून आपल्या सायकलवर बसून विक्रीला
बाहेर पडायचे. (नंतर थोडे बरे बरे दिवस आल्यावर लुनावर बसून विक्रीसाठी बाहेर
पडायचे.) ओरडून विकण्यासाठी भोंगा (लाऊड स्पीकर ) घेऊन
ते निघायचे. मंडई परिसरात महापालिकेने त्यांना एक टपरी भाड्याने दिली होती. आपल्या
पेपर मधल्या बातम्यातून एक –दोन आकर्षक हेडिंगचा मजकूर
मोठ्याने वाचून रस्त्यावरील लोकांपर्यंत पोहोचवायचे असा त्यांचा दिनक्रम होता.
पाच-दहा पैसे, नंतर वीस पैसे किंमत
असे. किती विक्री होई, गल्ला किती होई कुणास ठाऊक. त्यांच्या
या पत्रकारितेचे अर्थशास्त्र काय असावे याचा आम्ही फारसा विचार केला नाही.
दैनिकात काम करणाऱ्या बड्या दैनिकाच्या पत्रकारांना त्यांनी
छापलेल्या बातम्यांचा उपयोग व्हायचा. शहरातल्या मोठ्या क्राईमच्या बातम्यांच्या
तपशिलाचा अपडेट घेऊन हे पत्रकार आपलं काम संध्याकाळी सुरू करायचे. जकाते यांच्या
मेहनतीचे क्रेडिट मात्र त्यांना मोठ्या दैनिकांचे बातमीदार देत नसत. तसा प्रश्नच
उद्भवत नसे. जकातेंना तशी अपेक्षाही नसायची. पोलिसांकडून मिळालेल्या घटनांच्या
तपशिलाचा वापर करताना अगदी छोट्या मोठ्या कॉन्स्टेबलचा नावाचा उल्लेख ते आवर्जून
करायचे. त्यामुळे सारे पोलीस डिपार्टमेंट
त्यांच्यावर प्रेम करायचे. स्वतःहून तपशील फोन करून सांगायचे.
माझा आणि जकाते यांच्या कामाचे स्वरूप वेगळे असल्यामुळे आम्ही क्वचितच भेटायचो. भेट झालीच तर मी रस्त्यावरून चालत असताना ते आपल्या भोंग्यावरून ओरडून एखादी गमतीशीर हेडलाईन देत ग्राहकाला आकर्षित करून घ्यायचे. त्यावेळी हात दाखवून हसून आम्ही एकमेकांना ओळख देत असू.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचा कार्यवाह म्हणून मी काम करायला लागलो, तेव्हा त्यांना सभासदत्व आम्ही दिले त्याचे त्यांना फार अप्रूप वाटे.
आमच्या इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या राष्ट्रीय संघटनेचे अधिवेशन होई. त्याला पुण्याचे प्रतिनिधी जात असत. ओरिसा मधील जगन्नाथ पुरी जवळच्या कटक येथे त्यांना आम्ही नेले होते. मराठी
खेरीज इतर भाषा येत नसल्यामुळे संघटनेच्या कामकाजात त्यांचा सहभाग मर्यादित असे.
तरी देखील त्यांचे आणि देशभराtतून आलेल्या अनेक पत्रकारांचे चांगले सख्य जमायचे. महात्मा
गांधींचे ते एकनिष्ठ अनुयायी असल्यामुळे जाड्याभरड्या पांढऱ्या स्वच्छ खादीचा
झब्बा आणि पायघोळ पायजमा हा त्यांचा ठरलेला वेश असायचा. दाढीचे खुंट वाढलेले,
जाडा भरडा आवाज यामुळे ते अनेकांच्या लक्षात राहायचे. यापेक्षाही
आणखी एका कारणाने ते सगळ्यांच्या लक्षात राहायचे. महात्माजींच्या स्वातंत्र्यपूर्व
चळवळीत काम करीत असताना त्यांना अटक झाली होती. सुटका झाली तेव्हा तुरुंगातून
बाहेर पडताना अनवाणी चालण्याचे व्रत त्यांनी घेतले
होते. मृत्यू पर्यंत ते त्यांनी पाळले. पुण्या
बाहेरच्या रेल्वे, बस प्रवासात देखील त्यांनी कधी चप्पल
वापरली नाही. याविषयी बाहेरच्यांना कळले की त्यांच्याविषयी सगळ्यांना आदर वाटायचा. अचंबित होऊन ते पत्रकार महासंघाच्या अधिवेशन स्थळी बाहेरच्या
प्रदेशातील प्रतिनिधी त्यांना भेटायला यायचे. त्यांच्या सायंदैनिकांच्या कामाच्या पद्धतीची माहिती मिळाली की त्यांच्याविषयीचा आदर
व्दिगुणित व्हायचा.
नंतर काही वर्षांनी जकाते पत्रकारनगर येथे आमच्या कॉलनीत शेजारीच
राहायला आले. आपलं स्वतःचं घर झालं याचं त्यांना साहजिकच आमच्यासारखंच खूप कौतुक
होतं, खुश असायचे.
जकाते यांना महाराष्ट्र आणि केंद्र शासनाचे ताम्रपट मिळाले.
नियमाप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे त्यांना मानधन मिळाले. त्यांची पत्रकारिता
सुरु होती तेव्हा मंडई परिसरातील हातगाडी वाले, पथारीवाले,
फुलं विकण्याऱ्या महिला, यांच्या मदतीला ते
धावून जायचे. त्यामुळे ते सगळे जकाते यांना प्रेमाने आणि आदराने वागवायचे. घर
बांधण्यासाठी त्यांना निधी कमी पडतो आहे हे कळल्यावर त्यांनी जमेल तितका फंड गोळा
करून दिला. याचा ते नंतर कृतज्ञतापूर्वक उल्लेख करीत.
या साऱ्या गोष्टी आता विस्मरणात गेल्या होत्या. संध्या दैनिकातील
त्यांचे सहकारी असलेले मनोहर सप्रे यांनी लिहिलेल्या “होल्टा : आठव, अनुभव, अनुभूती”
या पुस्तकात मला अद्याप माहिती नसलेल्या अनेक गोष्टी आणि त्यांची
जगावेगळी पत्रकारिता त्याबद्दल जकाते यांच्या विषयी थोडे सविस्तर आणि आत्मीयतेने
लिहिले आहे. मनोहर सप्रे यांच्या अनुमतीने तो मजकूर
येथे देत आहे:
स. आ. जकाते गुन्हेगारी बातम्या द्यायचे. पाच फूट उंचीचे जाडजूड
असलेले जकाते स्वभावाने विनोदी. ते पूर्वी 'भोंगा'
नावाचं चालवायचे. नंतर त्यांनी ते बंद केल. राज्यभरातल्या
गुन्हेगारी स्वरुपाच्या बातम्या ते भोंग्यात वापरायचे.
ते ज्या बातम्या द्यायचे त्या सगळ्या आम्ही (सप्रे आणि इतर उपसंपादक) छापायचे. ते मथळे द्यायचे ते मोठे मजेदार असत. वृत्तपत्रीयदृष्ट्या ते तसे बरोबर
नसायचे
एकदा कुठेतरी घरात रात्री पेटत ठेवलेली चिमणी मांजराच्या धक्क्याने
पडली. पेटती चिमणी पडून आग लागली आणि एकजण भाजला. खरं तर ही बातमी
तशी आवश्यक नव्हती; पण जकातेंनी दिली म्हणून
छापली. त्याचा मथळा त्यांनी दिला, तो असा.
मांजरानं चिमणी पाडली
हणमंता ससूनमध्ये
असे मथळे वाचून वाचकही हसायचे, लोकांना ते
आवडायचं. अंक खपायचा. पोलीस खात्यात 'संध्या’ बद्दल फार प्रेम होतं. कारण अधिकाऱ्यांची नावं छापायचे. जकाते अनेक पोलिसांचीही नावं टाकायचे. जकाते सकाळी प्रेसवर येऊन दुपारी
बातमी समजली की, फोन करायचे. त्यांचा खास टोन असायचा. “जकाते बोलतोऽऽय; घ्या बातमी.” मग फोनवरच पॉईंट घ्यायचे आणि बातमी लिहून काढायची. बऱ्याच वेळा जकाते
छापखान्यात येतानाच हॉटेलात स्पेशल सांगून यायचे.
बातम्या लिहून झाल्या की, लूनावर बसून जायचे,
ते हातगाडी युनियनचे अध्यक्ष होते. वर्षानुवर्षे त्यांनी ते काम
केलं. त्यांची एक टपरी होती. तिथं ते दुपारपर्यंत असायचे.
हातगाडीवाल्यांसाठी त्यांनी मोर्चे काढले. त्यांचा गुन्हेगारी विषयक
कायद्याचा चांगला अभ्यास होता. कलमे पाठ असत. एकसारखं अक्षर होतं. मंडई जवळ ते
राहायचे. नंतर पत्रकार कॉलनी मध्ये घर घेतल.
दीड दोनशे पगारावर ते काम करायचे. त्यांच्या पगाराचं पाकीट संध्या कार्यालयातून न चुकता एक तारखेला यायचं. नवं घर घेण्याच्या कल्पनेने ते सुखावले होते. मोठ्या अडचणीत होते. त्यांच्या हातगाडीवाल्या बांधवांनी त्यांच्यासाठी एक कार्यक्रम आणि सत्कार घडविला. त्यातून त्यांना मदत केली
अत्यन्त सरळ स्वभावाचा हा माणूस होता. तितकाच मिश्कील. लिहिण्याची
हौस आणि अभ्यासही होता. विशेषतः पोलिसांच्या
चुकीच्या हाताळणीमुळे गुन्हेगार कसे घडतात, यावर ते लिहायचे,
'चित्रगुप्त' नावाचे सदर ते लिहायचे, वयोमानाने ते थकले आणि त्यांचं निधन झालं.
त्यांची नात पुढे पुणे श्रमिक पत्रकार संघात नोकरी करायची. निर्मळ चेहरा असलेली ही हसतमुख मुलगी, पुष्पा त्यांची नात
आहे हे समजले तेव्हा जकातेचा जीवनपट समोर आला. त्यांची दुसरी नातं छाया ही देखील
पुण्यात असते.
त्यांची सून लता हिने आयुष्याभर त्यांची खूप सेवा केली. त्यांचे २६
मार्च १९८९ रोजी प्रदीर्घ आजारपणात निधन झाले. त्याचा
वकील नातू किशोर मधुकर जकाते, पत्नी प्राची आणि आई लता
नातवंडाबरोबर पत्रकारनगर मध्ये आता राहत आहेत.
जकाते 'भोंगा ' आणि 'भुंगा' या सायदैनिकांच्या आठवणी सांगायचे, परभाणे नावाचे प्रेसवाले होते. त्यांनी 'भुंगा'
काढला होता. तर जकातेंनी 'भोंगा' काढला. स्वतः सायकलवर एक भोंगा लावायचे. या भोंग्यातून ते बातम्या
ओरडायचे. बातम्या पुण्यातल्याच असायच्या असे नाही. गडचिरोलीची बातमीही चालायची.
पतीने पत्नीच्या पोटात कात्री खुपसली वगैरे बातमी असायची.
स्वतः अंक काढायचा आणि स्वतः विकायचा; असं
उदाहरण पहिलंच असावं.
जकाते आठवण सांगायचे, ती १९५७
च्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची. तेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री होते. त्यांचं नाव सारखे चर्चेत असायचं, त्यांच्या
नावाचा वापर जकातेंनी 'भोंगा' खपवण्यासाठी
एकदा केला. कसा ते पाहा...
जकाते हातगाडी युनियनचे अध्यक्ष होते. त्यांच्या
युनियनमध्ये यशवंत चव्हाण नावाचा एक पदाधिकारी होता. त्याच्याकडून जकातेंनी
राजीनामा लिहून घेत भोंग्यात बातमी छापली- "यशवंतराव चव्हाण यांचा राजीनामा
" बातमी भोंग्यात हेडिंगमध्ये आली. स्वतः जकाते यांनी यशवंतराव चव्हाण यांचा
राजीनामा असा मथळा ओरडून अंक खपवत होते. ही आठवण ते
पुन्हा पुन्हा सांगायचे.
होल्टा
आठव, अनुभव, अनुभूती लेखक: मनोहर सप्रे
इमेल: manohasaprepunए@gmail.com
रुपये ३००, ISBN ९७८-८१-९५०१८८-३-३
सदामंगल पब्लिकेशन, मुंबई
--
प्रा डॉ किरण ठाकूर drkiranthakur@gmail.com
No comments:
Post a Comment