Wednesday, 23 December 2009

मायक्रोसॉफ्टच्या भाषिक बांधीलकीबाबतचा अनुभव उद्वेगजनक

मराठीची उपेक्षा
संगणकावर भारतीय भाषांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम व भाषा या प्रकल्पांची घोषणा मायक्रोसॉफ्टने चार वर्षांपूर्वी गाजावाजा करत केली होती. मात्र सद्यस्थितीत संगणकाचा वापर करणाऱ्या मराठी भाषाप्रेमींचा व संगणक तज्ज्ञांचा मायक्रोसॉफ्टच्या भाषिक बांधीलकीबाबतचा अनुभव उद्वेगजनक आहे.
महाराष्ट्रातील संगणक वापरणाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्टने त्यांच्या ‘विन्डोज’ या ऑपरेटिंग सिस्टिम व इतर प्रणाल्यांसाठी प्रमाणित व सुगम मराठीची भाषिक आवृत्ती द्यावी, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या मराठी अभ्यास केंद्रातील तज्ज्ञांना मायक्रोसॉफ्ट इंडिया याबतीत तोकडे पडलेले वाटते. “विन्डोज एक्स पी (XP) व ऑफिस-प्रणाल्यांतील मराठी भाषेच्या त्रुटी आम्ही एका निवेदनाद्वारे मायक्रोसॉफ्टच्या भारतातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिल्या होत्या. यांत मराठी युनिकोड कार्यान्वित ऑपरेटिंग सिस्टमचा संच, कळफलकातील सुधारणा, मराठीतून कार्यपुस्तिकेचा अभाव असेही मराठीशी निगडीत मुद्दे होते.
प्रगत व्यवहार-क्षेत्रांत मराठी भाषेला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या मराठी अभ्यास केंद्र या स्वयंसेवी संस्थेने मायक्रोसॉफ्टशी संपर्कासाठी गेले एक वर्षभर खटाटोप चालवला आहे. मेघश्याम करनाम या मायक्रोसॉफ्टच्या भारतातील अधिकाऱ्याशी संस्थेचे कार्यवाह राममोहन खानापूरकर यांनी एक वर्षापूर्वी संपर्क करुन चर्चेसाठी भेटीची वेळ मागितली होती. अनेकदा आठवण करुनही त्याची आश्वासनपूर्ती करण्याची कोणतीही तसदी करनाम यांनी दाखवली नाही. त्यानंतर १७ मे २००९ रोजी अभ्यास केंद्राने मायक्रोसॉफ्ट इंडियाच्याच प्रादेशिक विभागातील अधिकारी श्रीनिवास गॅरीमेला यांना ‘Localization of Microsoft Products in Maharashtra’ या विषयाचे विस्तृत निवेदन सादर केले होते. या पत्राची प्रत माहितीसाठी मायक्रोसॉफ्ट इंडियाचे वरिष्ठ अधिकारी संजीव रेगे व नितिन कपूर यांनाही पाठवली गेली होती. सदर पत्रात मराठी आवृत्तीचे दोष मायक्रोसॉफ्टने सुधारावेत यासाठी चर्चा करण्याची व सहकार्याची तयारी अभ्यास केंद्राने दर्शवली होती. अशाच आशयाचे पत्र मार्च २००९ मध्ये मायक्रोसॉफ्टच्या आयर्लंडमधील कार्यालयातही अभ्यास केंद्रातील संगणक तज्ज्ञ नितिन निमकर यांनी पाठवले होते. आयर्लंड कार्यालयाने या पत्रावर कार्यवाही करण्यास मायक्रोसॉफ्टच्या भारतातील कार्यालयास सुचविले होते. ‘एवढे करुनदेखील आजतागायत मायक्रोसॉफ्टकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे हा सर्व खटाटोप व्यर्थ गेला असेच म्हणावे लागेल’.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळांमध्ये मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरद्वारे संगणक-प्रशिक्षणासाठी केलेल्या करारामुळे मायक्रोसॉफ्टला मराठीच्याप्रती उत्तरदायी करणे ही शासनाची जबाबदारी आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या या कराराला मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांनी चांगली प्रसिद्धी दिली होती. मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांसमवेत हस्तांदोलन करतानाची शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजयकुमार यांची छायाचित्रे झळकल्यामुळे शासनाला मराठीच्या मागण्यांसाठी हात झटकता येणार नाहीत असेही दीपक पवार म्हणाले. निव्वळ लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र, गोवा व भारताच्या इतर राज्यांमध्ये नऊ कोटी मराठी भाषिक आहेत. महाराष्ट्रातील संगणक-साक्षरतेच्या दृष्टीकोनातून संगणक वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असून मराठीच्या संगणकावरील उपलब्धतेमुळे ही संख्या वेगाने वाढण्याची शक्यता आहे असा मुद्दाही दीपक पवार यांनी यासंदर्भात उपस्थित केला.
ऑपरेटिंग सिस्टीमच्या (कार्यकारी प्रणाली) विकास व व्यापार क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट अग्रस्थानी असल्यामुळे मराठी आवृत्यांचा दृश्यफलक, मदतीसाठीच्या सूचनांची हेल्प फाईल व कार्यपुस्तिका या सगळ्यासाठी संगणकीय मराठीच्या परिभाषेचे सुबोध प्रमाणीकरण त्यांनीच करणे अपेक्षित आहे. मात्र याबाबतीत मायक्रोसॉफ्ट इंडियाचा गतइतिहास फारसा समाधानकारक नाही,” असे मराठी अभ्यास केंद्राचे संगणक-तज्ज्ञ नितिन निमकर यांचे मत आहे. मायक्रोसॉफ्टने सध्या उपलब्ध असलेल्या त्यांच्या मराठी आवृत्तीत मराठी व हिंदी यांची देवनागरी लिपी एकच असल्याचे मानून त्यांच्यात भाषिक साधर्म्य साधण्याची गल्लत केली आहे. हिंदीतील तज्ज्ञांना मराठीचे ज्ञान आपसूकच असणार अशा चुकीच्या धारणेमुळे मायक्रोसॉफ्टच्या मराठी आवृत्तीवर हिंदीचा ठसा उमटलेला दिसून येतो.
मराठी अभ्यास केंद्रातील भाषाविज्ञान तज्ज्ञ सुशान्त देवळेकर यांच्या मतानुसार विन्डोज एक्स पीची मराठी आवृत्ती भाषिकदृष्ट्या सदोष आहे. अनेक पारिभाषिक संज्ञा तसेच हेल्प फाईल्समधील सूचनांसाठी वापरण्यात आलेली तांत्रिक भाषा ही स्वीकारार्ह तांत्रिक लिखाणाच्या निकषांवर उतरणारी नाहीत असे सुशान्त देवळेकरांना वाटते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही ठिकाणी तर निखालस चुकीचे शब्द घुसवल्यामुळे मराठी आवृत्तीत भाषिक गोंधळ निर्माण झालेला दिसतो.
व्यावसायिक भाषांतरकार विजय पाध्ये यांच्या निरीक्षणानुसार विन्डोजच्या मराठी आवृत्त्यांत अनेक ठिकाणी मराठी शब्द व वाक्प्रचार हे इंग्रजीचेच लिप्यंतरण असून, काही ठिकाणी शब्दाला शब्द जुळवण्याचा अट्टाहास असल्याचे मत मांडले आहे. त्यामुळे काही वेळेस हे शब्द विनोदी वाटतात तर बरेचवेळा भाषाप्रेमींच्या संयमाची परीक्षा पाहणारे ठरतात. मराठीतून तांत्रिक लिखाणाचे अपुरे ज्ञान व त्यात गुंतवणूक करण्याची मानसिकता नसल्यामुळेच मराठी लोकांच्या माथी अशी थातुरमातुर पद्धतीने बनवलेली हिंदीसदृश मराठी आवृत्ती मायक्रोसॉफ्टने मारलेली आहे असे चित्र यामुळे दिसून येते.
सॉफ्टवेअर सल्लागार सलील कुळकर्णी यांच्यामते इंग्रजी प्रणाली विकसित करताना वापरणाऱ्यांच्या सोयीसाठी हरप्रकारे सजग असणाऱ्या मायक्रोसॉफ्टने मराठीची मात्र हेळसांड चालवली आहे. विन्डोज एक्स पी व व्हिस्टाच्या हेल्प फाईल्समध्ये पुष्कळ सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. इंग्रजीप्रमाणे एकसमान कळफलक नसणे ही मराठीतून संगणक वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी अडचण असल्याचे सलील कुळकर्णी यांनी नमूद केले. भाषा-प्रणाली बनवणाऱ्या अनेक उत्पादकांनी आपापल्या सोयीप्रमाणे कळफलक बनवल्यामुळे व विक्रेत्यांनी त्यांना उत्तेजन दिल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. मराठीसाठी प्रमाणित कळफलक बनवण्याचे प्रयत्न सी-डॅक या शासनमान्य संस्थेकडून दोन दशकांपूर्वी होऊनदेखील निव्वळ अनास्थेमुळे त्याची उपेक्षा झाली आहे. मायक्रोसॉफ्टने मराठीसाठी स्वीकारलेल्या इनस्क्रिप्टच्या कळफलकांत देखील काही दोष आहेत. उदा० < > ? अशी चिन्हे व काही मराठी अक्षरांचा इनस्क्रिप्टमध्ये थेट वापर करता येत नाही. याबाबतसुद्धा मायक्रोसॉफ्टने पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टम वा मायक्रोसॉफ्ट प्रणाल्यांच्या संचात मराठीतून माहिती-पुस्तिका नसल्याचे राममोहन खानापूरकर यांनी नजरेस आणून दिले आहे. तसेच महाजालावर मराठीतून ऑनलाईन सहकार्याची सोय देखील(कार्यकारी प्रणाली) मायक्रॉसॉफ्टने दिलेली नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मायक्रोसॉफ्टने महाराष्ट्रात ऑपरेटिंग सिस्टम विकताना युनिकोड मराठीचा पर्याय कार्यान्वित करुनच विकावा जेणेकरुन लोकांना मराठीतून काम करण्याची सोय आपसूकच उपलब्ध होईल.
भारतीय भाषांच्या संगणकावरील वापरासाठी युनिकोड संकेतप्रणालीला केंद्र सरकारने मान्यता दिलेली असून मायक्रोसॉफ्टने २००० पुढील विन्डोजच्या सर्व आवृत्त्यांमध्ये त्याचा आपसूकच समावेश केला आहे. तरीदेखील मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत सॉफ्टवेअर विक्रेत्यांनी किंवा महाजालावर कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांनी संगणक वापरणाऱ्या सामान्य लोकांना याची माहिती देण्याची कोणतीच व्यवस्था निर्माण केली नसल्याची खंत नितिन निमकर यांनी व्यक्त केली.
संगणकीय मराठीच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव श्रीमती लीना मेहेंदळे यांनी पुढाकार घेतल्यामुळे मराठी अभ्यास केंद्राने संबंधित विषयासंदर्भात आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले होते. यासाठी वेळोवेळी झालेल्या बैठकांत अभ्यास केंद्राच्या सदस्यांनी मायक्रोसॉफ्टला मराठीसाठी उत्तरदायी करण्याचे आग्रहाचे प्रतिपादन केले होते. युनिकोडच्या प्रसारासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अध्यक्ष श्री० विवेक सावंत यांचीही भेट अभ्यास केंद्राने घेतली होती. त्यावेळेस मायक्रोसॉफ्टच्या प्रतिनिधींशी विवेक सावंत यांनी स्वत: संपर्क साधून चर्चेसाठी आमंत्रण दिले होते. अशाप्रकारे अनेक पातळ्यांवर वर्षभर नेटाने प्रयत्न करुनदेखील मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या अधिकाऱ्यांनी त्याची आजतागायत दखल घेतलेली नाही. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे भूतपूर्व माहिती संचालक भ० प्र० सिंग यांची अभ्यास केंद्राच्या सदस्यांनी भेट घेऊन शासनाने मायक्रोसॉफ्टला मराठीबाबत जाब विचारावा असे सांगितले असता, ‘एखाद्या खासगी कंपनीला शासन असे सांगू शकत नाही’ असे कचखाऊ उत्तर त्यांनी दिले होते.
आत्तापर्यंत झालेल्या दिरंगाईची भरपाई करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने मराठीच्या प्रमाणीकरणासाठी ताबडतोब पावले उचलावीत असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी केले आहे. तसे झाल्यास मार्च २०१० मध्ये होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन प्रमाणित संगणकीय मराठीचा प्रसार करणे सुकर होईल. या प्रतिष्ठित सोहळ्यासाठी हजारो मराठी भाषाप्रेमी उपस्थित राहाणार असून माध्यमांतूनही त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी लाभणार आहे.
मायक्रोसॉफ्टने मराठीच्या संगणकीय प्रमाणीकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्यापासून उभारी घेऊन सर्व भारतीय भाषांचा संगणकीय उत्कर्ष साधण्यास मदत होईल व भारतात संगणक साक्षरता वाढीस लागेल असा विश्वास मराठी अभ्यास केंद्राला वाटतो.
--
दीपक पवार, (अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र)
deepak@marathivikas.org, ९८२०४३७६६५
Dated 23.12.09

1 comment:

Anonymous said...

Sir,
waiting for next post...
Happy New Year.
- bapu atrange