Tuesday, 1 February 2011

आपला समाज सुसंस्कृततेच्या मार्गावर पुन्हा वाटचाल करू लागेल.. अरुण टिकेकर


ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक यांनी इ मेल ने पाठविलेला हा मजकूर मुद्दाम मराठी पत्रकार आणि लेखक यांच्या प्रबोधना साठी येथे देत आहे. (धन्यवाद सुभाष!)

पत्रकार-संशोधक आणि लोकसत्ताचे माजी संपादक डॉ. अरुण टिकेकर यांना 26 जानेवारी रोजी पुण्यात महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत..

चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट. एका बहुचर्चित ग्रंथाच्या परीक्षणात्मक लेखात मी त्या ग्रंथलेखकावर वाङमयचौर्याचा आरोप करताना हजार-बाराशे शब्दांत ‘वाङमयचौर्य’ अथवाडल्ला’ असा कोणताही शब्द वापरला नव्हता. त्या लेखावरच्या दोन प्रातिनिधिक प्रतिक्रिया मला या माझ्या मोठय़ा सन्मानाच्या प्रसंगी सांगाव्याशा वाटतातकारण या उदाहरणावरून माझ्या लेखनशैलीवर इतरांकडून होणा-या टीका-टिप्पणीला आपोआप उत्तर मिळेल असं मला वाटलं. पहिली प्रतिक्रिया आमच्या शाळेचे मुख्याध्यापकप्राध्यापक के.पं. मंगळवेढेकर यांची. त्यांनी पत्र लिहून मला शाबासकी दिली होती. ‘सौम्य शब्दांत पण स्पष्टपणे आणि परखडपणे लिहिलं तर ते अधिक झोंबतं’ हा त्यांचा अभिप्राय होतातर लेख ज्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला त्याच्या संपादकांनी म्हटलं होतं, ‘तुमच्याइतका मसाला मला मिळाला असता नातर मी पहिल्याच वाक्यात लेखक महाशयांना इतकी जोरात चपराक ठेवून दिली असती कीत्यांना तिरीमिरी आली असतीकारणं वगैरे मी नंतर दिली असती. तुम्ही काय केलंयअनेकदा त्याला खिंडीत गाठून ‘आता तुला का मारू नये’ असं प्रत्येक वेळी म्हणत राहिलात!’ ज्याच्या नैतिक अधिकाराची आणि विद्वत्तेची ओळखही वाचकांना पटलेली नसते असा एखादा लेखक-संपादक आज चटकन संपादकीयात किंवा लेखात ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असं लोकमान्य टिळकांच्या आविर्भावात विचारतोतेव्हा मला हा पूर्वीचा प्रसंग आठवतो. लोकमान्यांनी हे शीर्षक अग्रलेखाला दिलंत्या वेळी परकीय सरकार होतंहे तरी ध्यानात घ्यायला हवं निदान! ही अशी भाषा मला असभ्यपणाची वाटते. अंतिमत: ती परिणामकारक होत नाही असं माझं मत आहे. महात्मा गांधींनी एकदा ब्रिटिश पार्लमेंटला prostitute म्हणून संबोधिलं होतं. पण या शब्दामुळे तमाम स्त्रीवर्गाचा अवमान होतोहे ध्यानात येऊन त्यांनी या शब्दाच्या वापराबद्दल स्वत:हून खेद व्यक्त केला होता. हे उदाहरण मला सदैव मार्गदर्शक वाटतं.

मी लिहिलं- मराठीत आणि इंग्रजीतही. ते स्पष्ट शब्दांत तरीही सभ्यता न सोडता लिहिलेलं असावं. यासाठी मी गेल्या पंचवीसाधिक वर्षात विशेष प्रयत्न केले. इतरांचे जाहीररीत्या कपडे फाडले तर आपल्याला नेहमीच बरं वाटतं. आपलं मनोरंजनही होतंपण तीच बाब आपल्या बाबतीत घडली तर मात्र आपण संपादकांवर वा लेखकावर आगपाखड करू लागतो. माझा खरा मुद्दा वेगळाच आहे. अशा भडकसनसनाटी टीकेचा वाचकांवर काही परिणाम होतो कातर नाही. आजच्या वृत्तपत्र संपादकानं समाज-मन बदलण्यासाठी लिहिणं आवश्यक आहेअसं मला वाटतं. घणाघाती टीकेनं मनोरंजन होईल,टाळ्या पडतीलकाही जण स्तुतिसुमनंही उधळतीलपण समाजमनावर निश्चित असा परिणाम होणार नाही. चांगल्या समाजबदलासाठी सौम्य भाषेत समाजघटकांना विचार करायला लावणंपटवून सांगणं अगत्याचं आहेहे माझं मत केवळ ते माझ्या प्रकृतीला मानवणारं आहे म्हणून सांगत नाहीतर विचारपूर्वक मी ते स्वीकारलं आहे.

पीएच.डी.साठी प्रबंध लिहिताना मी एकोणिसाव्या शतकाचा वेध घेण्याचा जो प्रयत्न आरंभलात्यात न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळक या दोन लोकोत्तर व्यक्तींच्या विचारांचा अभ्यास करणं मला क्रमप्राप्त होतं. टिळकांची जहाल भाषा आणि रानडय़ांची सौम्य भाषा यात मला रानडे यांच्या विचारपद्धतीत तसेच भाषाशैलीत अधिक गुण आढळले. त्यामुळे रानडे यांच्या उदारमतवादी विचारांचा पाठपुरावा करत मी मार्गक्रमण केलं आहे. रानडे-संप्रदाय आणि टिळक-संप्रदाय या दोन वैचारिक प्रवाहांपैकी मी रानडे-संप्रदाय स्वीकारला आहे कातर तसा मी पूर्णपणे रानडे-संप्रदायाचा नाही.

न्यायमूर्ती रानडे हे मूलत: सश्रद्धपरमेश्वर हाच विश्वाच्या केंद्रस्थानी असल्याचं समजणारेमानणारे आणि त्या मताचा प्रसार करणारे. मी या बाबतीत आगरकरवादीनिधर्मी बुद्धिवादाला मानणारा. मात्र मला रानडय़ांचा उदारमतवाद मनोमन पटतो. ‘सामाजिक उत्क्रांतीच होतेसामाजिक क्रांती होत नसते,’ हे रानडय़ांचं मत मला पूर्णपणे पटतं. समाज-मन बदलल्याशिवाय समाज बदलणार नाही. या त्यांच्या मताशी तर मी पूर्णपणे सहमत आहे. आगरकरी भाषेपेक्षा रानडय़ांच्या भाषेची मोहिनी मला पडली. माझ्या लेखनात प्रश्नचिन्हं फार असतातअसा सूर लावणारेही आहेत. खरंच आहे ते. एखाद्या चबुत-यावर उभं राहून आजच्या समाजाला मी उपदेशाचे डोस पाजत राहिलो तर कोणी माझं ऐकेल कामाझ्या लेखनाचा त्यांच्यावर प्रभाव पडेल काअशी शंका मला नेहमी वाटते. माझी डॉक्टरकी ही वैद्यकीय पेशातली नाही. त्यामुळे ‘दे इंजेक्शन आणि कर आजार बरा’, अशातला प्रकार माझ्या बाबतीत शक्य नाही. शिवाय समाजाला इंजेक्शन देण्याची पात्रता माझ्याकडे नाहीहे मला चांगलं ठाऊक आहेकदाचित समाजाचं अनारोग्य हे इंजेक्शन घेऊन बरं होण्याच्या पलीकडं गेलं आहे. समाजाच्या समस्यांची सर्व उत्तरं माझ्याकडे आहेतअसाही माझा दावा नाही. मग मी काय करू शकतोतर माझ्याइतकीच किंबहुना अधिक बुद्धी असलेल्या वाचकांसमोर मला पडणारे प्रश्न मांडू शकतोत्यांना विचार करायला लावून त्या समस्यांची आपापली उत्तरं शोधायला उद्युक्त करू शकतोहीच माझी भूमिका आजपर्यंत राहिली आहे.

हे मी कादंबरीसारख्या सर्जनशील वाङ्मयकृतीतून करू शकलो असतो काकरू शकलो असतोजर माझ्याकडे तशी प्रतिभा असेल तर. जेव्हा म्हणून संस्कृतीचा अपकर्ष होतोतेव्हा अवश्यपणे कलाविकास होतो. (when culture declines art flourishes) असा सामाजिक सिद्धांत मांडला जातो. जेव्हा जेव्हा संस्कृतीची घसरण होतेसमाज भ्रष्ट होतोसमाजघटक मतलबी बनताततेव्हा तेव्हा विविध कला अधिक विकसित होतातया सिद्धांतावर माझा विश्वास आहे. साहित्यिक,कलावंत थयथयाट न करता आपापल्या कला-माध्यमांतून भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध शांततापूर्वक बंड करून उठतात आणि समाज-मनात बदल घडवून आणतातहे अनेक संस्कृतीच्या इतिहासात पाहायला मिळतं. आपल्या आजच्या समाजात संस्कृतीचा अपकर्ष झाला आहेपण साहित्यिककलावंत थिजून गेल्याप्रमाणे आज तरी शांत बसले आहेतसंवेदनाहीन झाल्यासारखे. ते जागृत होतीलतो महाराष्ट्राच्या दृष्टीने सुदिन ठरणार आहे.

सांगायचं असं की मी सर्जनशील साहित्याच्या क्षेत्रात उतरू शकलो असतोमाझ्याकडे तेवढी प्रतिभा असती तर. पण ती तशी माझ्याकडे आहे की नाहीहे मी पडताळून पाहण्याची संधीच मला मिळाली नाही. त्याला कारण होतं माझे आदरणीय काका- श्री. रा. टिकेकर. प्राध्यापकीला सुरुवात केल्याकेल्या मी चार-दोन कथा लिहिल्या होत्या. त्यातील एक ‘सत्यकथेत प्रसिद्धही झाली होती. त्या काळी ‘सत्यकथेत कथा प्रसिद्ध झालेला लेखक महिनाभर तरी जमिनीपासून दोन-चार इंच उंच हवेत चालायचा. पण ती प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या माझ्या काकांच्या घरी मी राहत असेत्यांच्या धाकानं मी मात्र धास्तावलेला होतो. त्यांना ती कथा मी दाखवली नव्हतीपण कोठून तरी त्यांना ती ज्ञात झाली असणारत्यांनी मला समोर बसवून इतिहासलेखन आणि कथा-कादंबरी लेखन ही एकमेकाला पूरक कशी नाहीतउलट एकमेकाला मारक कशी आहेतयावर माझं बौद्धिक घेतलं. .. अखेरीस मला पटलं कीइतिहासलेखन आणि कथा-कादंबरी लेखन या दोहोंसाठी वेगवेगळी मानसिक जडणघडण लागते. काका-पुतण्याच्या या एका बैठकीत ‘सत्यकथेनं एक ‘होतकरू’ कथालेखक गमावला. माझा मात्र ‘ललित संशोधन’ या हल्लीच्या परवलीच्या शब्दापासून बचाव झाला.

माझ्या आयुष्यातील तिसरी घटना. काकांचा एक लेख घेऊन मी ‘इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य संपादक असलेल्या व्ही.के. नरसिंहन यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी मला समोरच्या खुर्चीवर बसवून माझीही चौकशी केलीमी काय करत आहे वगैरे.. इंग्लिश घेऊन एम.ए. करत आहेअसं म्हणताच ते उद्गारले, 'but have your parents thought about the future of  English language in India?’  चार दशकांपूर्वी त्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाने मी गांगरून गेलो होतो खरा. पण इतक्या वर्षानंतर आज मला मी इंग्रजी शिकलो ते योग्यच केलंअन्यथा इंग्रजी वाङमयातील उत्तम साहित्यकृती आणि गंभीर वैचारिक लेखन यांच्या आस्वादाला मुकलो असतो असं वाटतं. इंग्लिश वा अन्य भाषा शिकण्यात गैर काय हे मला कधीच कळलं नाही. अर्थात मातृभाषेला पर्याय नाहीती प्रत्येकाला आलीच पाहिजे. मातृभाषेतील मौलिक साहित्यकृतींचा आस्वाद प्रत्येकानं घेतलाच पाहिजे. तो शाळेत-प्रशालेत वा महाविद्यालयात घ्यावा वा घरी अथवा वाचनालयात घ्यावापण आपलं असं झालं आहे कीइंग्रजीचा बागुलबुवा करत आपण मराठीकडे दुर्लक्ष करत आहोत. कदाचित आपली इंग्लिश भाषा सुधारली तर त्याबरोबर आपली मराठी हीसुद्धा सुधारेल. मराठी दुर्लक्षिली जात असल्याबद्दल आपण कोलाहल करतोपण भाषेबद्दलवाङमयाबद्दल आपली अनास्था घालवण्याचा प्रयत्न करत नाही.

मराठी भाषेत संकल्पना निर्माण होण्याचंनव्या शब्दांची भर पडण्याचं थांबलं आहेयाचा विषाद आपल्याला वाटत नाही. इंग्रजी-मराठीचा जो संघर्ष आपण लावला आहे तो बेगडी आहेअसं माझ मत आहे. प्रत्येक लेखक भाषातज्ज्ञ असेलच असं नाही. लेखकाच्या अधिकारात प्रत्येक जण भाषांच्या समस्यांवर बोलू लागलातर गोंधळच माजणार. नेमकं तेच आपल्या बाबतीत झालं आहे. इंग्रजीत लिहिणारे मराठी लेखक तरी कोठे आहेतउत्कृष्ट मराठी वाङमयकृती इंग्रजी किंवा अन्य भाषेत अनुवादित करणारे तरी किती आहेत?
 एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात दोन्ही भाषांत लिहिणारी मंडळी होतीती एकाएकी कोठे गेलीफार तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मंडळी आज आपल्यात आहेत आणि आपल्या लेखकांना जागतिक स्तरावर जाता का येत नाहीयाची चर्चा मात्र आपण उच्चरवात करत असतो. एखादा-दुसरा लेख इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या मराठी लेखकाचं दोन्ही भाषांवर प्रभुत्व असल्याची आपली समजूत होते. भाषेवर प्रभुत्व सहजासहजी मिळत नाहीकिंवा थोडय़ाथोडक्या प्रयत्नांनी मिळत नाहीत्यासाठी अखंड साधना करावी लागतेहे आपण ध्यानात घ्यायला तयार नसतो. परखड लेखनातही भडकपणा अथवा सनसनाटी नसावीते सौम्य आणि सभ्यतेची मर्यादा न ओलांडणारं असावंलेखनात अनावश्यक शब्द टाळण्याचा प्रयत्न करावाबंदिस्तकाळजीपूर्वक केलेलं असं लेखन असावंकृत्रिमअलंकारिक किंवा टाळ्या मिळवणा-या वाक्यांचा वापर टाळावाभाषेबाबतच्या अशा संकेतांबरोबर आपल्याकडे विनाकारण मोठेपणा घेऊ नयेसमाज-मनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करावा.. अशी जी शिकवण घरच्यांनीशालेय आणि महाविद्यालयीन गुरुजनांनी वेळोवेळी दिलीती पाळण्याचा मी प्रयत्न केला. या मार्गक्रमणात वाङमयापाठोपाठ स्थानीय इतिहाससामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासअसे टप्पे गाठत गेलोते गाठताना पुन्हा पुन्हा विद्यार्थीपण स्वीकारत गेलो.परंतु 30-35 वर्षापूर्वीचा आपला समाज आणि आजचा आपला समाज यात महदंतर पडलं आहे. सामोपचारसौम्यपणासभ्यता यांचं समाजाला वावडं आहे की काय असं वाटू लागलं आहे. सौम्य आवाज हा क्षीणदुर्बल आवाज मानण्याकडे समाजाची प्रवृत्ती बनली आहे. त्यामुळे समानधर्मीय अल्पसंख्याकात मी आहेयाची मला जाणीव आहे. तरीही आज ना उद्याआपला समाजसुसंस्कृततेच्या मार्गावर पुन्हा वाटचाल करू लागेलअशी खात्री मला वाटते. तोपर्यंत माझ्यासारख्यांनी उमेद कायम टिकवली पाहिजे. 
--

1 comment:

SUBHASH said...

धन्यवाद सर् ! तुम्ही मोठेच काम केलेत!हे विचार सर्वदूर पोहोचले पाहिजेत! -सुभाष