Friday, 16 July 2010

दोन तरुणांच्या प्रयत्नांमुळे आसाममधील तरुणीची सुटका

Loksatta's senior correspondent Sunil Kaduskar joined detectives of Crime Branch to rescue a young girl who was kidnapped from Assam and sold to Pune brothel. A rare case of activist journalism. Here is the Marathi story:

सुनील कडूसकर, पुणे, ९ जुलै
बदनाम वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठेतील दुपारची वेळ.. शरीर विक्रयाच्या या बाजारात वर्दळ सुरू असते.. रेडिओ, टीव्हीवरील फिल्मी गाण्यांचा गोंगाट.. पानाच्या ठेल्याभोवती उभे राहिल्याचे निमित्त करून शरिरांना न्याहाळणाऱ्या बुभूक्षितांच्या नजरा..
तेवढय़ात साध्या वेशातील सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस वेगाने त्या तीन मजली इमारतीत शिरतात. झपाटय़ाने जिने चढत ते तिसऱ्या मजल्यावर पोहोचतात. त्यांच्यासमवेत आलेला तो तरुण मुलगा बाकडय़ावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या त्या सुंदर तरुणीकडे अंगुलीनिर्देश करतो. या नरकयातनांतून सुटण्याचा क्षण आता जवळ आलाय याची जाणीव होताच या असाहाय्य तरुणीच्या भावनांचा बांध फुटतो आणि त्या तरुणासमवेत असलेल्या महिला पोलिसाच्या मिठीत शिरून ती आपल्या आसवांना वाट मोकळी करून देते. सदैव गुन्ह्य़ासंबंधीच्या वातावरणात राहिल्याने पोलिसांच्या भावना बोथट झालेल्या असतात या समजाला छेद देत ती महिला पोलीसही या मिठीने गदगदून जाते आणि तिचेही डोळे नकळत पाणावतात.
आसाममधील मोनीगावातून (तेजपूर) फसवून आणून येथील कुंटणखाण्यात विकल्या गेलेल्या १७ वर्षीय सुशिक्षित तरुणीची पोलिसांनी आज नाटय़मयरीतीने सुटका केली. २६ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयातून घरी परत निघालेल्या या तरुणीला बहिणीला भेटविण्याच्या बहाण्याने मिथुन ऊर्फ बिट्टू चौधरी (तेजपूर) या परिचित तरुणाने व त्याच्या मित्रांनी तेथील रेल्वे स्टेशनवर नेले. त्यानंतर पुणे स्टेशनवर रिक्षात बसतानाच आपण खूप दूर आलो असल्याची जाणीव तिला झाली. स्टेशनवरून निघालेली ही रिक्षा थेट बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पोहोचली. तिच्याकडील मोबाईल व पैसे काढून घेऊन एका कुंटणखान्यात तिची विक्री करून ते पसार झाले.
कुंटणखाण्यात झालेली मारहाण व छळ सोसेनासा झाल्याने तिलाही चेहऱ्याला रंग फासून ग्राहकांना सामोरे जावे लागले. सुरुवातीसच ग्राहक म्हणून आलेल्या एका तरुणाकडे तिने आपले मन मोकळे केले. त्याने या अबलेची कहाणी अमोल पायघन व प्रवीण तापकीर या आपल्या मित्रांना सांगितली. हडपसर येथे राहणाऱ्या या विद्यार्थ्यांंनी मग तिच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी त्यांच्या एका मित्राने त्यांना थेट पोलिसांकडे जाण्याऐवजी ‘लोकसत्ता’मधील या प्रतिनिधीशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे सोमवारी (५ जुलै) रात्री जरा घाबरत घाबरतच त्यांनी फोन केला. विश्वास बळावताच हडपसर येथे राहणारे हे दोघे रात्री साडेदहा वाजताच भेटायला आले. मोठय़ा धाडसाने त्यांनी आपल्या मोबाईलवर घेतलेला त्या मुलीचा फोटो व त्या मुलीने स्वहस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठीही दाखविली. दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या या मुलीच्या सुटकेसाठी काहीही करण्याची त्यांची तडफ पाहून मीही त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार केला.
काही सामाजिक कार्यकर्त्यांंशी चर्चा केल्यानंतर मदतीसाठी फरासखाना पोलिसांकडे गेल्यास काय होईल, याचा अंदाज आला. त्यामुळे या प्रकरणी थेट सह पोलीस आयुक्त राजेंद्र सोनावणे आणि अतिरिक्त आयुक्त अनंतराव शिंदे यांनाच साकडे घालायचे ठरविले. त्यांनीही गोपनीयता पाळत गुन्हे कार्यप्रणाली शाखेचे (एमओबी) निरीक्षक राजेंद्र भामरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख शिवाजी देवकर व त्यांच्या सहकाऱ्यांची मदत घेऊन आम्ही या तरुणीच्या सुटकेची योजना आखली. ठरल्यानुसार बुधवारी (७ जुलै) दुपारी प्रवीण व अमोलला या तरुणीची भेट घेण्यासाठी धाडले. परंतु, कुंटणखान्यातील अन्य मुलींनी प्रवीणला ओळखल्याने त्यांनी तिची भेटच घेऊ दिली नाही. त्यामुळे निराश होऊन हे दोघे तरुण परत फिरले. या घटनेनंतर त्यांना चैन पडत नव्हती. रात्रभर ते याचाच विचार करीत होते. काल त्यांनी आपल्या एका तिसऱ्याच मित्राला बुधवार पेठेतील त्या ‘नव्या इमारतीत’ पाठविले. फोटो पाहिलेला असल्याने त्यांच्या मित्राने त्या मुलीला ओळखले. ती तेथेच असल्याची खात्री झाल्यावर काल रात्री त्याने मला तसे कळविले. त्यामुळे आज दुपारी भामरे व देवकर यांच्याशी चर्चा करून तिच्या सुटकेची नवी योजना आखली. प्रवीण व अमोलऐवजी त्यांच्या नव्या मित्राला तेथे पाठवायचे ठरले. तो तेथे गेलाही परंतु, तेथील वातावरणाला घाबरून माघारी फिरला. त्यानंतर अमोल मात्र धाडसाने पुढे सरकला. ती तेथेच असल्याचा इशारा त्याने प्रवीणला केला आणि मग काही मिनिटातच सामाजिक सुरक्षा विभागाने सापळा आवळला.
या विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक विमल बिडवे, पोलीस शिपाई धनश्री मोरे, ऊर्मिला भंडलकर, सहायक फौजदार सुभाष सुळके, पोलीस नाईक, तानाजी निकम, विनायक पाठक, सोहनलाल सिटुले, दत्ता जाधव, हरिदास बांडे यांच्यासह मीही या इमारतीत शिरलो आणि तिची सुटका केली.
कुंटणखान्याची मालकीण सपना मनबहादूर तमांग (वय ३५, घ. नं. ९९४ बुधवार पेठ, नवीन बिल्डिंग, तिसरा मजला, मूळ गाव-सोनखणी, नेपाळ) हिला पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून वेश्याव्यवसायास भाग पाडल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.
नजरेतूनच व्यक्त केली कृतज्ञता
या तरुणीच्या सुटकेसाठी मोठी जोखीम उचलत सर्वस्व पणाला लावणाऱ्या अमोल व प्रवीणने सायंकाळी सामाजिक सुरक्षा विभागात जाऊन पुन्हा तिची भेट घेतली. याच तरुणांनी तुझ्या सुटकेसाठी प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगताच तिचे डोळे पुन्हा पाणावले.
भरल्या डोळ्यांनीच तिने त्यांचे आभार मानले. तिच्या सुटकेसाठी आपण काही करू शकलो याचा आनंद त्यांच्याही चेहऱ्यावर होता.

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=84848:2010-07-09-18-46-26&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212

No comments: