या महत्त्वाच्या घटनेचे साक्षी म्हणून उपलब्ध आहेत ते त्या वेळचे वृत्त संपादक चंद्रशेखर कारखानिस. त्यांनी परवाचे बुलेटीन सुरुवात करताना आवर्जून आठवण केली ती या मुलेटीनची निर्मिती मुळात सुरुवात झाली कशी या मुद्द्यावरून. आकाशवाणीच्या दिल्लीच्या वृत्त विभागाचे प्रमुख म्हणून त्यावेळी एस सी भट हे अतिशय कर्तव्यदक्ष, कल्पक अधिकारी काम करीत होते. केंद्र शासनात राहून देखील बातम्यांची माध्यम क्षेत्रात असलेल्या मूल्यांची जाण असणारे अधिकारी म्हणून त्यांना मोठा मान होता. पुण्यातीलआकाशवाणी केंद्रावर सकाळी सात पाच रोज ब्रॉडकास्ट होणारे बुलेटीन सुरू करायचे आहे त्यासाठी माझी आणि आम्हा इंडियन इंफॉर्मेशन सर्विस मध्ये माझ्यासारखेच प्रशिक्षित झालेले श्री अष्टेकर यांचे नेमणूक झाली आहे सांगितले.
आम्हा दोघांना वार्तापत्र आकाशवाणीवर सुरू करायचे आहे ते देखील राजधानी नसलेल्या शहरात सुरू करायचे आहे याचे मोठे आश्चर्य वाटले होते. नंतर मात्र कळलं की स्वतः श्री एस सी भट यांना आपल्या मुंबईतल्या वास्तव्यामुळे पुण्याचे महत्त्व माहित होते. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचे निर्विवाद महत्त्व होतेच पण सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचे महत्त्व त्यांना नक्की माहीत होते, आम्हा दोघांच्या मदतीला कमलाकर पाठकजी आणि दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रातील जाणकार अनुभवी मराठी बुलेटीन निर्मिती करणारे सदाशिव दीक्षित आणि मराठी साहित्यिक श्रीमती सुधा नरवणे अशी टीम त्यांनी दिली होती. सकाळी सात पाचच्या बातम्यांचे बुलेटीन तयार करायचे म्हणजे आदल्या दिवशी संकलित केलेल्या बातम्या सकाळी पाचला उठून, संपादन करून, तयार करून ठेवणे आवश्यक होते.
महिन्यात सहा दिवसांच्या कॉन्ट्रॅक्टवर मराठी बुलेटीन साठी काम करू इच्छिणारे युवक आणि युवती निवडून सुरुवातीचे प्राथमिक ट्रेनिंग देऊन 30 एप्रिल 1975 रोजी बुलेटीन ची पूर्ण तयारी करून पहाटे रिहर्सल घेऊन मोठ्या आत्मविश्वासाने या संपूर्ण टीमने मराठी माध्यम विश्वात एक मोठे धाडसी पाऊल टाकले. त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा रेकॉर्डेड शुभेच्छा संदेश आधीच मिळवलेला होता. तो तयार झालेल्या इतर सर्व बातम्यां च्या मजकुरात समाविष्ट बरोबर सात वाजून पाच मिनिटांनी ही ऐतिहासिक घटना प्रत्यक्ष घडली.
आत्ता भारतीय लष्कराचे सेवानिवृत्त जनरल मनोज नरवणे यांनी आपल्या मातोश्री सुधा नरवणे यांच्या आवाजातील पहिले बुलेटीन वाचले गेले याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
मुद्रित क्षेत्रातील माझ्यासारखे पत्रकार आणि या महत्त्वाच्या माध्यम घडामोडी विषयी उत्सुकता असणारे असंख्य आकाशवाणी श्रोते जणू या घटनेची वाटच पाहत होते. पुणे आकाशवाणी केंद्राच्या फोनवर दिवसभर अभिनंदनाचे , कौतुकाचे आणि सूचनांचे असंख्य फोन आले आणि हा प्रयोग यशस्वी झाला यांची पावती मिळाली होती.
तेव्हा मी यु एन आय चा (युनायटेड न्यूज ऑफ इंडिया चा) पुणे मुक्कामी असलेला बातमीदार होतो. पुणे आकाशवाणी केंद्राच्या या नवीन सेवेचा मला नक्कीच लाभ होणार होता. (ते कसे ते मुद्दाम माहितीसाठी नोंदवतो). पुण्यात येण्यापूर्वी मी यु एन आय च्या मुंबई विभागीय कार्यालयात उपसंपादक म्हणून काम केले होते . तेव्हा माझे त्यावेळचे वरिष्ठ श्री चंदू मेढेकर यांनी घालून दिलेला दंडक मी पाळत होतोच. आमच्या बातमीच्या कामासाठी मुंबई, पुणे, आणि संपूर्ण महाराष्ट्र या क्षेत्रात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा पाठपुरावा करणे हे माझे रोजचे कामच होते. मुंबई च्या आमच्या कार्यालयात यासाठी दोन ट्रांजिस्टर सेट तयार ठेवले होते. त्यावेळी संध्याकाळी सात वाजता ट्रांजिस्टर ला कान लावून महाराष्ट्राच्या बातम्या कान देऊन ऐकणे हे आमचे एक महत्त्वाचे काम होते. तीच सवय पुण्यात आकाशवाणी केंद्रावर मराठीबातम्या प्रसारित होणे सुरू झाले तेव्हापासून मी आणि माझ्या घरातील सर्वांना हीच सवय अद्यापही आहे.
मध्यरात्रीनंतर रात्रभरात घडलेल्या महत्त्वाच्या बातम्या वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी पर्यंत वाचायला मिळत नाहीत. पुण्यात अगदी भल्या पहाटेपासूनच कार्यरत असलेल्या पुणे आकाशवाणी केंद्राच्या म्हणजे रिजनल न्यूज युनिट च्या (आर एन यु) च्या चंद्रशेखर कारखानीस यांच्या आणि त्यांच्या नंतर तेथे कार्यरत असलेल्या कार्यक्षम पत्रकार आणि त्यांचे तितकेच कार्यक्षम सहकारी मिळवितात आणि सात दहाच्या बुलेटिन मध्ये आपल्याला ऐकवतात. बाकी सर्व माध्यमकर्मी झोपलेले असतात, त्यामुळे असे काही महत्त्वाचे घडले असेल तर ती बातमी या पुण्यात आकाशवाणीच्या माध्यमातून मिळते. असे अनेक प्रसंग घडले की आमच्या मोठ्या बातमीच्या कव्हरेज ची सुरुवात आकाशवाणीच्या या गोष्टींमुळे झाली. यातला एक नमुना प्रतिनिधिकस्वरूपाचा आहे.
किल्लारीचा भूकंप झाला त्याच्या आदल्या दिवशीची ही घटना आहे.. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे पुण्यातील सर्व दैनिकांची कार्यालये बंद असतात. त्यामुळे त्यांच्या बातमीदारांना सुट्टी असते. बहुतेक दैनिकांचे बातमीदार या सुट्टीच्या निमित्ताने जवळपासच्या पर्यटन केंद्राला सहकुटुंब जातात. मी, लोकसत्ता चे अनिल टाकळकर आणि पत्रकार नगरच्या टेकडी ग्रुपचे बाकी आमचे सभासद आणि त्यांचे कुटुंबीय 29 सप्टेंबर 1993 ला आम्ही असेच एका जवळच्या पर्यटन केंद्राला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी परत जायचे असा प्लॅन होता . किल्लारी ला भूकंप दुसऱ्या दिवशी सकाळच्या बातम्या मी सवयीप्रमाणे ऐकल्या. त्या दिवशी किल्लारी ला भूकंप झाल्याचे पहिली बातमी ही आकाशवाणीने प्रसारित केली होती. सर्व जगाला प्रथम ही माहिती त्यावेळच्या वृत्तसंपादक संज्योत आमोणडिकर यांनी दिली होती. ती ऐकली आणि मी टाकळकर असे पत्रकार पुण्याला घरी परत यायला तातडीने निघालो आणि तिथून सलग सरळ किल्लारीच्या दिशेने निघालो. वाटेत थांबत मिळेल तिथून फोन करून आपापल्या कार्यालयाच्या प्रमुखांना बातम्यांचे मिळेल तेवढे अपडेट आम्ही घेण्याचा प्रयत्न केला .
तेव्हा टेलिफोन हेच एकमेव हेच माध्यम होते. साधा कॉल करायचा ही मोठी कसरत असायची. नशीब असेल तर एसटीडी कॉल मिळायचा. आठ पट दर असलेला लायटनिंग कॉल खूप खर्चिक होता. पण तरी आवश्यक तेव्हा करायचा.
किल्लारीत पोहोचून घटनांचे गांभीर्य प्रत्यक्ष पाहून आमच्या सविस्तर आणि लेटेस्ट करायला वेळ लागला. परंतु जगाला बातमी देण्यासाठी टप्प्या टप्प्यात आम्हाला यश मिळाले ती सुरुवात झाली होती ती आकाशवाणी केंद्राच्या बातम्यां मुळे.
आकाशवाणी या शासकीय माध्यमात काम करणारे माझे पत्रकार सहकारी वर्तमानपत्रातील बातमीदारांइतकेच प्रभावी पणे पत्रकारिता करीत असतात हे मी गेली काही वर्षे माध्याम क्षेत्रात प्रसंगानुरूप सांगत आलो आहे. त्याविषयी पुनः केव्हातरी.